कोतवाल पदासाठी उच्चशिक्षितही रांगेत!; १५७ जागांसाठी खोऱ्याने अर्ज…


बुलढाणा : जिल्ह्यात १५७ कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उच्च शिक्षित बेरोजगार देखील पुढे सरसावले आहे. बेरोजगारीची गंभीर समस्या व आकर्षक मानधनामुळे अंतिम मुदतीत मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची चिन्हे आहे. जिल्ह्यात १५७ कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बेरोजगारीची समस्या गंभीर झाल्याने व नोकर भरती जवळपास बंद असल्याने या पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज येण्याची दाट शक्यता आहे. अगोदरच्या तुलनेत आता या पदाला १५ हजार मानधन मिळत असल्याने चुरस वाढली आहे.

तेरा तहसील कार्यालयात अर्ज घेणे व दाखल करण्यासाठी युवक, युवतींची मोठी गर्दी होत असल्याचे वृत्त आहे. बुलढाणा तहसिल मध्ये आज मंगळवारी तोबा गर्दी उसळल्याचे दिसून आले. आज दुपारी २ वाजेपर्यंत केवळ बुलढाणा तहसीलमध्येच २९७ उमेदवारांनी अर्ज नेल्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले. हे चित्र लक्षात घेता अंतिम मुदत अर्थात ६ ऑक्टोबर अखेर १५७ पदांसाठी जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल होणार आहे.९ तारखेला छाननी होणार असून २२ ऑक्टोबर ला सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. प्रारूप निकाल २६ ला जाहीर होणार असून २७ तारखेला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना आक्षेप नोंदवता येतील.ते आक्षेप त्याच दिवशी निकाली काढण्यात येणार असून ३० ऑक्टोबर ला अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

मोठा महसुल जमा होणार

या भरतीमुळे शासनाच्या तिजोरीत चांगलीच भर पडणार आहे. कारण केवळ अर्जाचीच किंमत २० रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी ५०० तर राखीव प्रवर्गासाठी २५० परीक्षा शुल्क आहे.