वाहनाच्या प्रकाशाने डोळे दीपले, अपघातात तरुण ठार




 देसाईगंज तालुका मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरानजीक समोरून आलेल्या वाहनाच्या लख्ख प्रकाशाने डोळे दिपले. यात दुचाकीवरील ताबा सुटल्याने एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना १२ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ वाजता घडली.

आकाश दुर्योधन मेश्राम (२३, रा. पार्डी, ता. लाखांदूर, जि. भंडारा) असे मृतकाचे नाव आहे. साहिल कादर शेख (२३, रा. राणाप्रताप वार्ड, कुरखेडा) हा जखमी आहे. हे दोघे मित्र असून, कुरखेडा येथून दुचाकीवरून (एमएच ३१ बीटी ७४१०) देसाईगंजला निघाले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुमारास विरुद्ध दिशेने येत असलेल्या वाहनाच्या लख्ख प्रकाशाने

डोळे दीपल्याने आकाश मेश्रामचा ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी घसरली. दोघेही खाली कोसळले. आकाशच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी आकाश मेश्राम यास मृत घोषित करून विच्छेदनानंतर प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कोमल माने तपास करत आहेत.