वडसा: वनविभागांतर्गत येत असलेल्या कुरखेडा, कारेची, देसाईगंज, आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेलया जंगली हत्तींनी दोन दिवसापूर्वी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश करीत जंगल परिसरालगतच्या काही गावात उच्छाद माजविला. दरम्यान पोर्ला क्षेत्रातील नगरी व चुरचुरा या गावातील नागरीकांनी जंगली हत्तींना आपल्या क्षेत्रातून पिटाळून लावल्याची माहिती पुढे आली आहे. सद्यस्थितीत हत्तींचे कळप पाल नदीमार्गे आरमोरी तालुक्यात प्रयाण केल्याची सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
मागील काही महिन्यांपासून जंगली हत्तींचे कळप वडसा वनविभागात मुक्त संचार करीत आहे. या मार्गक्रमणादरम्यान हत्तींद्वारे
धान पिकांचे प्रचंड नासधूस केली जात आहे. जंगली हत्तींच्या हैदोसामुळे कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले होते. अशातच दोन दिवसांपूर्वी हत्तींचे कळप गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाले होते. या क्षेत्रातील तीन गावात हत्तींनी हैदोस घालित धान पिकांसह शेतीपयोगी साहित्यांची प्रचंड नासाडी केली. जंगली हत्तीमुळे त्रस्त झालेल्या चुरचुरा व नगरी येथील ग्रामस्थांनी हत्तींना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. सदर हत्ती चुरचुरा मार्गे पाल नदी ओलांडून परत आरमोरी हद्दीत गेल्याची माहिती आहे. नागरिकांनी हत्तींना पिटाळून लावण्याची जोखीम पत्करु नये, असे आवाहन केले आहे.