तलाठ्यांची बदली आता जिल्ह्यात कोठेही होणार*


मुंबई : राज्य शासनाने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित केली आहे. त्यामुळे प्रांताधिकार्‍यांचे अधिकार कमी झाले असून, तलाठी बदल्यांचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत फक्त दोन तालुक्यांत काम करणार्‍या तलाठी भाऊसाहेबांना आता जिल्ह्यात कोठेही जावे लागणार आहे.
  महसूल विभागातील सर्वांत कनिष्ठ पण महत्त्वपूर्ण असलेल्या तलाठी (गट-क) संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालय स्तरावर असून, आस्थापनाविषयक बाबी, बिंदुनामावली, बदली आदीबाबत उपविभागीय स्तरावर कार्यवाही करण्यात येते. २०१३ नंतर उपविभागीय कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे दोन तालुक्यांसाठी एक उपविभागीय कार्यालय निर्माण झाले. 
             सेवाज्येष्ठतेबाबत गुंतागुंत निर्माण होऊन, काही तलाठ्यांना उपविभागाबाहेर जाण्यास इच्छुक असल्यास त्यांची सेवाज्येष्ठता गमावली जाऊ लागली. या सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयात प्रकरणे देखील गेली आहेत. त्यामुळे तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने १८ सप्टेंबर २०२३ रोजी अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे आता तलाठी संवर्गाची नियुक्ती प्रांताधिकारी नाही तर आता जिल्हाधिकारी असतील. सेवाज्येष्ठता सूची जिल्हास्तरावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे तलाठीपदावर नियुक्त झालेली व्यक्ती जिल्हाभरात कोठेही बदलीस पात्र असणार आहे.