वाघाने केले पाच दिवसांत चार जनावरांना ठार म्हणून म्हणतो भाऊ गुरे चरायला नको घेऊन जाऊ.......




आरमोरी : - आरमोरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या वासाळा व रामाळा बिटातील पाण्याच्या टाकी जवळील जंगल परिसरात वाघाचा वावर वाढला असून गेल्या पाच दिवसांत मौजा वासाळा येथील गुराखी गुरे चरायला जंगल परिसरात घेऊन गेले असता वाघाने एक दिवसाच्या फरकाने लगातार चार गुरांवर हल्ला करून ठार केले आहे. तसेच गुराख्यांना सुध्दा वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

आरमोरी वनपरिक्षेत्रातील रामाळा, ठाणेगाव, वासाळा, वनखी, चामोर्शी कणेरी, सालमारा परिसरातील जंगलात वाघाचे अस्तित्व आहे. काही नागरिक जंगलात वाघ आहे, हे माहीत असूनही विनाकामाने जंगलात जावून धोका पत्करतात. अशावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडू शकतात. सद्या स्थितीत जंगल परिसरात वाघ फिरत असल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जंगलात वाघ असल्याने नागरिकांनी सरपनासाठी, अवैध वृक्षतोड करण्यासाठी , रानभाज्यासाठी ,सिंधी आणण्यासाठी विनाकारण जंगल परिसरात जाऊ नये, प्रेम-युगलांनी जंगल परिसरात फिरायला अथवा भेटायला जाऊ नये तसेच जंगलालगत शेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतावर जातांना सतर्कता बाळगावी तसेच सकाळी व सायंकाळी एकटे शेतात न जाता ग्रुपने जावे, गुराख्यांनी जंगलात गुरे, शेळ्या चराईसाठी नेऊ नये, रात्रीच्या वेळी विनाकारण जंगलातून पायी किंवा वाहनाने फिरू नये. वन्यप्राणी दिसल्यास फोटो काढण्याचा किंवा त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागाने परिसरातील नागरिकांना केले आहे.

वन्य प्राण्यांचा वावर वाढला असल्याने आपला जीव धोक्यात घालून कुणीही जंगल परिसरात जाऊ नका. वन्यप्राण्यांकडून काही पशू हानी किंवा मनुष्यहानी झाल्यास त्याची तात्काळ माहिती वनविभागास द्यावी असे
मा.श्री.पवनकुमार जोंग, परिविक्षाधिन वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी यांनी सांगितले.