सिर्सीमध्ये वाघाने घेतला गायीचा बळी




आठवडाभरात पाच जनावरे ठार


आरमोरी / वडधा : तालुक्यातील वासाळा रामाळा, ठाणेगाव परिसरातील पाण्याच्या टाकी जवळील जंगल परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. गेल्या आठ दिवसांत वाघाने चार गुरांवर हल्ला करून ठार केले आहे. दरम्यान, २६ सप्टेंबरला हरिदास लक्ष्मण झरकर यांची गाय सिर्सी जंगलात वाघाने ठार केली.

आरमोरी वनपरिक्षेत्रातील रामाळा, ठाणेगाव, वासाळा, वणखी चामोर्शी कणेरी, अंतरजी परिसरातील जंगलात वाघाचे अस्तित्व आहे. वाघाने गेल्या आठवडाभरात पाच गुरांवर हल्ला करून ठार केले आहे. काही नागरिक जंगलात वाघ आहे, हे माहीत असूनही विनाकामाने जंगलात जावून धोका पत्करतात. अशावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडू शकतात. सद्य स्थितीत जंगल परिसरात वाघ फिरत असल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जंगलात वाघ असल्याने नागरिकांनी सरपण, अवैध वृक्षतोड,रानभाज्या किंवा मशरूमसाठीविनाकारण जंगलात जाऊ नये, जंगलालगत शेत असलेल्या शेतकऱ्याने शेतावर जातांना सतर्कता बाळगावी तसेच एकटे शेतात न जाता ग्रुपने जावे, गुराख्यांनी जंगलात गुरे, शेळ्या चराईसाठी नेऊ नये, रात्रीच्या वेळी जंगलातून पायी किंवा वाहनाने फिरू नये. फोटो काढण्याचा, त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.



वन्य प्राण्यांचा वापर वाढला असल्याने आपला जीव धोक्यात घालून कुणीही नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नका. वन्यप्राण्यांकडून काही पशू हानी किंवा मनुष्यहानी झाल्यास त्याची तत्काळ माहिती वनविभागास द्यावी.

-पवनकुमार जोंग, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी