पिकांचे नुकसान : कच्चेपार, गुंजेवाही, खैरी परिसरात आढळला हत्ती
सिंदेवाही : ओडिसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचिरोलीच्या जंगलमार्गे वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नंतर सावली, नागभीड तालुक्यातील जंगलात फिरून आता सिंदेवाही तालुक्यात आला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही, खैरी, कच्चेपार शेतशिवारात फिरून तो पिकांचे नुकसान करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कच्चेपार गावात दोन ते तीन दिवसांपासून हत्तीने शेतशिवारात थैमान घातले. यात जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
हत्तीच्या नियंत्रणासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. हत्तीच्या दहशतीत राहण्याची गरज नसून अजूनपर्यंत मनुष्यावर हल्ला केल्याचे दिसत नाही. केवळ हत्तीला बघण्याची गर्दी करत असताना सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाले असल्यास वन कर्मचाऱ्यांकडे अर्ज द्यावे, पंचनामे तत्काळ भरून नुकसानभरपाई देण्यात येईल.
- विशाल सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही.