आरोपींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देणारा पीएसआय राठोड निलंबित


नागपूर: बारा वर्षीय मुलीच्या गुप्तंगाला सिगारेटचे चटके देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडीत “व्हीआयपी ट्रीटमेंट” देणारे पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांना निलंबित करण्यात आले.

पोलीस ठाण्यात आरोपीला मोबाईलवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच आरोपींसाठी हॉटेलमधून जेवण बोलावणे हा प्रकार राठोड यांच्या अंगलट आला. हा प्रकार एका वादग्रस्त महिला पोलीसाने मोबाईलमध्ये कैद केला आणि पत्रकारांना उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.

एवढ्या संवेद्नशील प्रकरणातील आरोपींना पोलीस पाहुण्यासारखी वागणूक देत असल्यानंतरही हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत हे ‘असे घडलेच नाही’, असे सांगून प्रसारमाध्यमांची दिशाभूल करीत होते. मात्र, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी चौकशीनंतर पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांना निलंबित केले.