प्रबोधनकार ठाकरेंनी गणपतीची मूर्तीच फोडून टाकण्याची धमकी का दिली होती?आशय येडगे
Role,बीबीसी मराठी
20 सप्टेंबर 2023
"आज जर तीन वाजेपर्यंत आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क देण्याचा शहाणपणा जावळे कमिटीने दाखविला नाही, तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन."

साल होतं 1926, स्थळ होतं दादर आणि हे उद्गार होते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे.

महाराष्ट्राचा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

गणेशोत्सवाच्या काळात आपल्या राज्यात राहणारा माणूस त्याची जात, धर्म विसरून या उत्सवात सहभागी होतो.

राज्यभरात हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतात.

समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली गेली होती. पण मुंबईतल्या दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये कालांतराने या महोत्सवाच्या या मूळ हेतूला फाटा देऊन केवळ काही जातसमूहाच्या हाती देण्याचा प्रयत्न विसाव्या शतकाच्या सुरुवातीला होत होता, असं प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय.
अशा परिस्थितीत प्रबोधनकार ठाकरेंनी गणपतीची मूर्तीच फोडून टाकण्याची धमकी का दिली होती? 1926 सालच्या गणेशोत्सवानंतर तब्बल तीस वर्षं मुंबईतल्या दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव का साजरा केला गेला नाही?

मुळात ज्या उत्सवाची सुरुवात लोकांना एकत्र आणण्यासाठी झालेली होती त्या उत्सवामध्ये निर्माण झालेल्या स्पृश्य-अस्पृश्यांचा वाद नेमका काय होता? आणि प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर बोले यांच्या पुढाकारातून साजरा झालेला 1926 सालचा गणेशोत्सव ऐतिहासिकरित्या वादग्रस्त का ठरला होता? याचीच ही गोष्ट.

1926 ला दादरच्या गणेशोत्सव मंडळात नेमकं काय घडलं होतं?
प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या 'माझी जीवनगाथा' या पुस्तकात हा सबंध घटनाक्रम सांगितला आहे. दादरमध्ये त्याकाळी राहणाऱ्या लोकांचं वर्णन करताना प्रबोधनकार म्हणतात की, "त्यापूर्वी दादरला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद कुठेच नव्हता.

'ये रे दिवसा भर रे पोटा' वृत्तीच्या लोकांनी गजबजलेल्या या विभागात कसलाही वाद खेळायला लोकांना वेळच नव्हता. तिथे राहणाऱ्या सगळ्याच जमाती पोटार्थी होत्या."

मुंबईत आज ज्याप्रमाणे लोकलच्या वेळापत्रकावर धावणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी आहे अगदी त्याचप्रमाणे त्याही काळी दादरमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांची गर्दी होती. पण या परिसरात सगळे सार्वजनिक सण मात्र मोठ्या उत्साहाने साजरे केले जायचे.
त्याकाळच्या सार्वजनिक उत्सवांवर दादरमध्ये राहणाऱ्या ब्राह्मण समाजाचा पगडा होता. असं असलं तरीही सगळ्या जाती धर्माचे लोक वर्गणी मात्र आवर्जून द्यायचे.

अनेकांना सार्वजनिक गणेशोत्सवात काम करायला वेळ नसायचा त्यामुळे गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये ब्राह्मण मंडळींच्या वर्चस्वावर कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता.

मात्र, कालांतराने याचा परिणाम असा झाला की दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले सगळेच पदाधिकारी ब्राह्मण बनले.

एवढंच नाही तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तिथे बोलविण्यात येणारी शाहीर, कीर्तनकार, वक्ते ही हेदेखील ब्राह्मण समाजाचेच असायचे.

एखाद्या गावकऱ्याने ब्राह्मण नसलेल्या कवी, शाहिरांचे नाव सुचवले तर कार्यकारी मंडळ ते नाव मान्य करायचे नाही. दादर मध्ये राहणाऱ्या ब्राह्मण समाजातील काही व्यक्तींची ही मनमानी बघून ब्राह्मणेतर समाजातील तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली युवक मंडळं काढली होती.

प्रबोधनकार ठाकरेंनी हे लिहिलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव जर अखिल हिंदूंचा, तर त्यात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग घेता आला पाहिजे. इतकेच काय, पण कोणत्याही अस्पृश्याला सार्वजनिक उत्सवातल्या गणेश मूर्तीचे पूजन स्वतः करण्याचा हक्क असला पाहिजे ही भूमिका या सगळ्या युवक मंडळांची होती.

त्यामुळे मग एका ब्राह्मणेतर युवक संघाने दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला त्यासंदर्भातील पत्र पाठवलं.

त्याकाळी डॉ. मो. चि. जावळे हे या मंडळाचे अध्यक्ष होते. सुधारक युवक संघाचं हे पत्र धडकलं आणि दादरच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीत जणू भूकंप आला.

युवक मंडळातील कार्यकर्त्यांनी सुमारे पाचशे बहुजन व्यक्तींकडून प्रत्येकी चार आणे वर्गणी जमवून त्याआधीच गणेशोत्सव मंडळाचं सभासदत्व घेतलेलं होतं.

अस्पृश्य समजले जाणारे लोक धर्माने हिंदूच असल्यामुळे, सार्वजनिक म्हणविणाऱ्या गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्तीचे प्रत्यक्ष शिवून पूजन करण्याचा त्यांना हक्क असलाच पाहिजे, आणि तो आम्ही यंदा सिद्ध करणार अशी मागणी या युवक मंडळाने केलेली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्याकाळी ठिकठिकाणी अशा युवक चळवळी सुरु होत्या. त्यामुळे गणेश चतुर्थी दिवशी नेमकं काय होणार यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळाचे अध्यक्ष डॉ. जावळे यांनी ब्रिटिशांची एक पोलीस पार्टी आधीच त्या भागात बोलावली होती.
या प्रसंगाबाबत बोलतांना ज्येष्ठ संपादक सचिन परब म्हणाले की, "त्याकाळी डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी अस्पृश्य समाजातील लोकांच्या हक्कांसाठी अशी आंदोलनं सुरु होती.

दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. मो. चि. जावळे हे त्याकाळी ब्राह्मण समाजाचे नेते म्हणून ओळखले जात होते.

त्याकाळी दादरच्या कबुतरखान्याजवळ असणाऱ्या मशिदीबाबत एक वाद निर्माण झाला होता, त्या वादात जावळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना 'मशीदफेम' जावळे म्हणून ओळखले जात होते.

पुढे जाऊन ते मुंबईचे महापौरही बनले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भंडारी समाजाचे नेते राव बहादूर बोले आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दादरचे हे आंदोलन करण्यात आलं."

आणि गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला
दादरच्या टिळक पुलाच्या पायथ्याशी गणपतीचा मंडप सजवण्यात आलेला होता.

त्यादिवशी सकाळी त्या मंडपात बनवण्यात आलेल्या मखरात गणपतीची मूर्ती आणून ठेवली होती आणि दुसरीकडे टिळक पुलावर बहुजन समाजातील तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे जमा होत होते. राव बहादूर बोलेंच्या नेतृत्वात सुधारक तरुण मंडळाची ही गर्दी पुलावर थांबली होती.

प्रबोधनकार सांगतात की "10 च्या सुमाराला भास्कर कद्रेकर माझ्याकडे धापा टाकीत आला. पुलावर लोकांचा भला मोठा जमाव गोळा झाला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे.

रावबहादूर बोले सकाळपासून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. तुम्हाला बोल्यांनी ताबडतोब बोलाविले आहे. चला. "

हे ऐकून प्रबोधनकार ठाकरे तिथे गेले आणि जमलेल्या गर्दीला म्हणाले की, "इथं कशाला थांबलात ? सगळेच लोक उत्सवाचे मेंबर आहेत. तेव्हा चला सारे आपण प्रथम मंडप काबीज करू. आपलाच आहे तो."
त्यांनी असं म्हणताच सुमारे पाचशे ते सहाशे तरुणांची गर्दी गणपतीच्या मंडपात घुसली.

डॉ. जावळे यांनी बोलावलेल्या ब्रिटिश पोलीस पार्टीने या गर्दीला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र प्रबोधनकारांनी सांगितलं की, "इथे कोणतीही दंगल झालेली नाही, त्यामुळे पोलिसांचं इथे काहीच काम नाही, तुम्हीच इथून निघून जा. मानद न्यायाधीश रावसाहेब बोले इथे उपस्थित आहेत त्यामुळे पोलिसांची आम्हाला अजिबात गरज नाही."

हे ऐकून पोलिसांची तुकडी आणि डॉ. जावळेंच्या नेतृत्वातील कार्यकर्ते बाजूला झाले आणि युवक मंडळाच्या नेत्यांची भाषणं तिथे होऊ लागली.

एव्हाना दुपारचे बारा वाजले होते आणि गणपतीची प्रतिष्ठापना मात्र होऊ शकलेली नव्हती. वाद मिटायची कसलीच चिन्हं दिसत नव्हती

प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले की, "आज जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क तीन वाजेपर्यंत देण्याचा शहाणपणा जावळे कमिटीने दाखविला नाही, तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन."

हे ऐकून डॉ. जावळेंनी रावबहादूर बोले यांच्याकडे धाव घेतली आणि हा वाद मिटवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडरकरांना पाचारण करण्याचं ठरलं.

डॉ. जावळे यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर बोले आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह पाच-सहा जणांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीत असं ठरलं की, 'आधी रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुजाऱ्याने गणेशाची प्राणप्रतिष्ठापूर्वक शास्त्रोक्त पूजाअर्चा करावी.

ती झाल्यावर कोणत्याही अस्पृशाने स्नान करून ओलेत्याने एक पुष्पगुच्छ स्वतः नेऊन त्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या हातात शिवून द्यावा आणि त्याने तो बिनतक्रारी शिवून घेऊन गणपतीला वाहावा.'

डॉ. आंबेडकरांचे अंगरक्षक राहिलेल्या मडकेबुवांनी गणपतीला फुलं वाहिली
यानंतर एक ज्येष्ठ दलित कार्यकर्ते मडके बुवा यांना अंघोळ घालण्यात आली आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी एक लाल गुलाबांचा गुच्छ ब्राम्हण पुजाऱ्याच्या हाती दिला आणि तो पुष्पगुच्छ गणपतीला वाहण्यात आला आणि अखेर त्यादिवशीचा हा वाद तिथेच संपला.

आता हे मडकेबुवा नेमके कोण होते याबाबत बोलताना सचिन परब म्हणतात की, "मडकेबुवा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. आताच्या मुंबईत परळचा जो मुख्य चौक आहे त्याला मडकेबुवांच नाव दिलेलं आहे."

"अंगापिंडाने धिप्पाड असणाऱ्या मडकेबुवांनी बाबासाहेबांचे अंगरक्षक म्हणूनही काम केलेलं होतं. त्यांच्या हातून हे फुल घेऊन गणपतीला वाहण्यात आलं.

प्रबोधनकारांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळेच हे घडू शकलं. मात्र यामुळे दादरचा गणेशोत्सव ठाकरेंनीच बंद पाडल्याची बोंबाबोब सुरु झाली."

ज्याकाळी दलितांना देवळाच्या आजूबाजूला फिरकण्याची परवानगी नव्हती, दलितांच्या सावलीमुळे विटाळ होतो असा समज काही मंडळींच्या मनात होता त्याकाळात केवळ ब्राम्हणांच्या हातून जाणाऱ्या पूजेचा एक भाग एका दलित व्यक्तीच्या हातून होणं ही खरोखर एक मोठी क्रांती होती.

क्रांती झाली, पण गणेशोत्सव मात्र बंद पडला...
प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, त्यावर्षीच्या अनंत चतुर्दशी पर्यंत सगळे कार्यक्रम सुरळीत पार पडले.

मात्र आंदोलनामुळे या उत्सवातला उत्साहच नाहीसा झाला होता. 'गणपती बाटाला' म्हणून कित्येक मंत्रजागरवाल्या भिक्षुकांनी ऐन वेळी निमंत्रणाला नकार दिला.

तेव्हा दुसरा कसला तरी कार्यक्रम ठेवून वेळ मारण्यात आली. आजवर या उत्सवाला सगळा जाती जमातीकडून वर्गण्या मिळत गेल्या.

पण यापुढे त्या कोणी देऊ नयेत, असा प्रचार झाला तर? अखेरच्या रात्री डॉ. जावळे यांनी भर सभेत सांगितलं की, "यंदाच्या झालेल्या प्रकारावरून हा उत्सव पुढे चालू ठेवणे सर्वतोपरी अशक्य आहे. निदान मी तरी या फंदात मुळीच पडणार नाही."

झालं दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव बंद पडला आणि पुढची तीस वर्षे दादर मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजराच झाला नाही.

त्यानंतर दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाला ‘सार्वजनिक’ असं विशेषण लावून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानंतर बहुजन समाजाला सामावून घेणारा एखादा उत्सव साजरा केला जावा यासाठी प्रबोधनकार ठाकरे आणि राव बहादूर बोले यांच्या नेतृत्वाखाली `लोकहितवादी संघ’ स्थापन करण्यात आला आणि त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव सुरु केला.

(संदर्भ - माझी जीवनगाथा - प्रबोधनकार ठाकरे)