भाजपला रोकण्यासाठी काँग्रेसने रातोरात 'फिल्डिंग' लावत काँग्रेसने भाजपचा हा 'प्लॅन' उधळून लावला



Chandrapur News: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव असलेल्या करंजीत भाजप समर्थक सदस्याला उपसरपंच बनविण्याचा प्लॅन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळवून लावला आहे. वर्षभरापासून गावात नसलेल्या उपसरपंचावर आज अविश्वास ठराव मांडण्यात येणार होता.

मात्र, अविश्वास ठरावाला सरपंच आणि उपसरपंच होऊ इच्छिणारा ग्रामपंचायत सदस्य असे दोघेच उपस्थित राहिले. त्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळला आणि भाजप समर्थक ग्रामपंचायत सदस्याचं उपसरंपच होण्याचं स्वप्न भंगल.



चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखलं जातं. विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव असलेल्या या करंजीत वडेट्टीवारांचे समर्थक कमलेश निमगडे यांच्या नेतृत्वात सत्ता आली. सरिता पेटकर या सरपंच झाल्या, तर जयश्री भडके यांना उपसरपंचपद देण्यात आले. तसेच कमलेश निमगडे यांचे चुलत बंधु समीर निमगडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.


सत्तास्थापनेवेळी आपणास उपसरपंचपद मिळेल ही आशा समीर निमगडे यांना होती. पण कमलेश निमगडे यांनी जयश्री भडके यांना उपसरपंच केलं. यामुळे समीर निमगडे प्रचंड नाराज झाले. त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत समीर निमगडे यांनी भाजपच्या पॅनलकडून संचालकाची निवडणूक लढवली व जिंकली. या काळात भाजप नेते अमर बोडलावार यांच्या ते जवळचे झाले.


उपसरपंच जयश्री भडके या गेल्या वर्षभरापासून गावात राहत नाहीत. अशावेळी त्यांच्यावर अविश्वास आणून स्वत: उपसरपंच बनण्याची निमगडेंना आशा होती. याबाबत सरपंच सरिता पेटकर व इतर सदस्यांना हा मुद्दा पटवून दिला. यानंतर करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयश्री भडके यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी सरपंच व इतर सदस्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आज हा अविश्वास ठराव आणण्यात येणार होता.


अविश्वास ठराव मंजुर व्हावा, यासाठी भाजप समर्थक समीर निमगडे यांनी जोरदार 'फिल्डींग' ही लावली होती. सरपंचानाही सत्तापक्षासोबत राहिल्यास आपला फायदा होईल हे पटवून दिले व त्यांना आपल्या बाजूने केले. अविश्वास ठराव घेण्यासाठी प्रशासनाचे पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले. मात्र, यावेळी ग्रामपंचायतीत सरंपच सरिता पेटकर व सदस्य समीर निमगडे हे दोघेच उपस्थित होते. तर बाकीचे सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे उपसरपंच जयश्री भडके यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला.

करंजीत भाजपला रोकण्यासाठी काँग्रेसने रातोरात 'फिल्डिंग' लावत काँग्रेसने भाजपचा हा 'प्लॅन' उधळून लावला. त्यामुळे वडेट्टीवारांच्या गावातच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून सध्या चांगलच राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे तुकेश वानोडे, निलेश संगमवार, सारनाथ बक्षी, वैभव निमगडे, महेद्र कुनघाटकर, आशिष निमगडे यांनी अविश्वास ठरावाच्यावेळी गैरहजर राहिलेल्या सदस्यांचे स्वागत केले.