चेक बाउन्स झाला; २५ लाखांचा दंड , चार महिन्यांचा कारावास ठोठावला





चंद्रपूर : अयोग्य धनादेश देऊन मित्राची फसवणूक करणाऱ्यास चंद्रपूरच्या फौजदारी न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रामटेके यांनी चार महिन्यांचा कारावास व २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई व एक महिन्याच्या आत देण्याची व ती न दिल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त सजा सुनावली आहे.

चंद्रपुरातील व्यावसायिक राजेंद्र रामलाल जयस्वाल यांनी फौजदारी न्यायालयात धनादेश अनादरप्रकरणी त्याचे मित्र सुनील विनायक चोपडा यांच्याविरोधात कलम १३८ पराक्राम्य अधिनियमान्वये तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायाधीशांनी २० सप्टेंबर रोजी सुनील चोपडा यांना दोषी ठरवून उपरोक्त सजा सुनावली. सुनील चोपडा यांनी राजेंद्र जयस्वाल यांच्याकडून १७ लाख रुपये तो घेतले होते









त्या रकमेची परतफेड करण्यासाठी तेवढ्याच रकमेचा धनादेश त्यांना दिला होता, तो धनादेश राजेंद्र जयस्वाल यांनी संबंधित बँकेत जमा केला असता अनादरीत होऊन परत आला. जयस्वाल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपण दिलेले पैसे मागितले. मात्र, त्यांनी परत देण्यास टोलवाटोलवी केली. त्यामुळे जयस्वाल यांनी चेक बाउन्सप्रकरणी फौजदारी न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने पुरावे तपासून चार महिन्यांचा कारावास व २५ लाख रुपयांचा दंड चोपडा यांना सुनावला. राजेंद्र जयस्वाल यांच्यातर्फे अॅड. प्रकाश सपाटे यांनी कामकाज बघितले..