मनुस्मृतीत महिलांबद्दल नेमकं काय म्हटलंय, ज्यावर आक्षेप घेतला जातो?


तुषार कुलकर्णी
बीबीसी मराठी प्रतिनिधी
10 जून 2023

"आपण 21व्या शतकात जगत आहोत. आपल्या आई किंवा आजीला विचारा, एकेकाळी लग्नासाठी 14-15 वर्षे हे कमाल वय होतं. मुलगी 17 वर्षांची होण्याआधीच मूल जन्माला घालत असे. मुली मुलांच्या आधी प्रौढ होतात. तुम्ही वाचणार नाहीच, पण एकदा मनुस्मृती वाचा."

हे विधान आहे गुजरात हायकोर्टाचे न्या. समीर जे. दवे यांचं. यावरून आता वादाला सुरुवात झालीय. 'लाईव्ह लॉ'नं ही बातमी दिलीय.

सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गरोदर असलेल्या अल्पवयीन बलात्कार पीडितेनं गर्भपाताच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. ही याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. समीर जे. दवे यांनी हे विधान केलं.

यावेळी न्या. दवेंनी हेही स्पष्ट केलं की, या प्रकरणात आम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता. कारण गर्भाला सात महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. गर्भपातामुळे अल्पवयीन मुलगी आणि गर्भ अशा दोघांनाही धोका असताना गर्भपाताची परवानगी देऊ शकत नाही, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं.

दरम्यान, गुजरात हायकोर्टानं या प्रकरणात अद्याप अंतिम निकाल दिला नाहीय. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अंतिम निकाल दिला जाईल. पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे.

मात्र, यातील न्या. दवेंच्या मनुस्मृतिबाबतच्या विधानानं वादाला तोंड फोडलं आहे.

लाईन
मनुस्मृतीत नेमकं काय आहे याविषयी बीबीसी मराठीने याआधी लेख प्रकाशित केला होता. तो पुन्हा प्रकाशित करत आहोत.

"लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं, लग्नानंतर पतीच्या, पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर राहावं. पण कोणत्याही परिस्थिती महिलेनं स्वतंत्र असू नये," मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात अशा अर्थाचा 148 वा श्लोक आहे. महिलांच्या बाबतीत मनुस्मृती काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होतं.

फक्त याच नव्हे तर दलित किंवा महिलांबाबत असे अनेक श्लोक मनुस्मृतीमध्ये आहेत. ज्यावर वेळोवेळी हरकत घेण्यात आली.

याआधी, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर या संतांपेक्षाही मनू श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

मनुस्मृती हा ग्रंथ गेल्या कित्येक वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अधूनमधून हे वाद उफाळून येत असतात. पण मनुस्मृती वादग्रस्त का आहे?

मनुस्मृतीत नेमकं काय आहे?
"स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. मनूने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या 2684 आहे, काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या 2694 आहे," अशी माहिती इतिहासकार नरहर कुरुंदकरांनी दिली आहे.

नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर तीन व्याख्यानं दिली होती. त्या व्याखानांच्या संग्रहात कुरुंदकरांनी मनुस्मृतीचं अंतरंग उलगडून दाखवलं आहे. "माझी भूमिका मनुस्मृती दहन करण्याचे स्वागत करणारीच आहे," असं कुरुंदकर स्पष्ट करतात.

मनुस्मृतीचं स्वरूप सांगताना कुरुंदकर लिहितात, "इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली. पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ, सृष्टीची निर्मिती, चार युगे, चार वर्ण, त्यांची कामे, ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय आले आहेत. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य, गुरूसेवा इत्यादी संस्कारांची माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार, विवाह विधी आणि श्राद्धाची माहिती आहे. चौथ्या अध्यायात गृहस्थधर्म, भक्ष्याभक्ष्य, 21 प्रकारचे नरक इत्यादी माहिती आहे."
"पाचव्या अध्यायात स्त्रीधर्म, शुद्धाशुद्ध इत्यादी माहिती पुन्हा देण्यात आली आहे. सहाव्या अध्यायात संन्यास आश्रम, सातव्या अध्यायात राजधर्म, आठव्या अध्यायात व्यवहार, साक्ष, गुन्हे, न्यायदान ही माहिती आहे. नवव्या अध्यायात वारसाहक्क, दहाव्या अध्यायात वर्णसंकर, अकराव्या अध्यायात पाप म्हणजे काय, हे सांगण्यात आलं आहे, बाराव्या अध्ययात तीन गुण, वेद प्रशंसा हे विषय आहेत. हे या ग्रंथांचं साधारण स्वरूप आहे," कुरुंदकर सांगतात.

मनुस्मृती ग्रंथांत हक्क, गुन्हे, साक्ष, न्यायदानाची माहिती आहे. त्यामुळे आजच्या काळातील IPC किंवा CrPC प्रमाणे याची रचना आहे असं वाटतं. पण त्याचं स्वरूप तसं नाही. इंग्रज येण्यापूर्वी देशात या ग्रंथाचा वापर कायद्याचा ग्रंथ म्हणून होत नव्हता, असं राजीव लोचन यांनी बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. राजीव लोचन हे पंजाब विद्यापिठात इतिहास हा विषय शिकवतात.

मग मनुस्मृतीला केव्हा महत्त्व आलं?
राजीव लोचन सांगतात, "इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाणग्रंथ आहे. त्यांनी या ग्रंथाच्या आधारे खटले चालवण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा. त्या आधारावर देशात हा समज रूढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे."

ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापित व्हावं यासाठी निर्मिती?
राजीव लोचन सांगतात, "ज्या काळात बौद्ध संघाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली. आणि ब्राह्मण हा सर्वांत श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला. या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे."
"एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई. ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यां वाईट होईल असं सांगण्यात येत असे. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे. पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे, तिला धार्मिक अधिकार नाहीत, पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्गप्राप्ती होऊ शकते हे त्यात लिहिलं आहे," राजीव लोचन सांगतात.

या विचारांना आव्हान कुणी दिलं?
मनुस्मृतीने शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तसंच शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून होतं त्यामुळे मनुस्मृतीत नेमकं काय आहे याची माहिती थोड्याफार ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणाला नव्हती. इंग्रजांच्या काळात कायद्यामुळे या ग्रंथाला महत्त्व प्राप्त झालं. विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचं भाषांतर इंग्रजीत केलं. इतर लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली.

"पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं. शेतमजूर, अल्पभूधारक आणि समाजातील दीन-दलितांची स्थिती पाहून त्यांनी शेठ आणि भट यांच्यावर टीका केली. मनुस्मृतीवर देखील त्यांनी टीका केली," असं राजीव लोचन सांगतात.

डॉ. आंबेडकर आणि मनुस्मृती दहन
25 डिसेंबर 1927 रोजी तत्कालिन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं.

"मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली होती त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं. मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीजं मनूने पेरली आहेत," असं डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम या ग्रंथात लिहिलं आहे.
त्यांच्या 'हू वेअर द शुद्राज' आणि 'अनाहायलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केली आहे.

महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली. या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं ते वर्णन करत. "चातुर्वण्य निर्माण करून मनूने श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं," असं डॉ. आंबेडकर म्हणत.

मनुवादी आणि मूलनिवासी
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर मनुस्मृतीचं देशभरात ठिकठिकाणी दहन होऊ लागलं. त्यानिमित्तानं वृत्तपत्रातून मनुस्मृतीबाबत चर्चा होऊ लागली. मनुस्मृतीचा देशावर असलेला प्रभाव, त्यामुळे समाजावर झालेले परिणाम याची चर्चा होऊ लागली. स्वातंत्र्यानंतरही देखील या गोष्टी सुरू राहिल्या.
सत्तरच्या दशकात कांशीराम यांनी बामसेफची स्थापना केली तेव्हा त्यांनी मनुवादी आणि मूलनिवासी अशी समाजाची रचना असल्याचं प्रतिपादन केलं.

जेएनयूचे प्राध्यापक विवेक कुमार सांगतात की "कांशीराम म्हणत की मनुस्मृतीच्या आधारावर वर्ग निर्माण करून असमान सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळे हा समाज 6,000 जातींमध्ये विभागला गेला."

मनुवादाला समर्थन करणाऱ्यांचे तीन गट
मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांच्या संख्या कमी नाही. मनुस्मृतीचं समर्थन करणारे ती कोणत्या आधारावर करतात याचं विश्लेषण इतिहासकार नरहर कुरुंदकर यांनी केलं आहे.
"पहिला आधार असा आहे की मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात की जग ब्रह्मदेवानं निर्माण केलं आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती-मनू-भृगू या परंपरेतून आला आहे त्यामुळे तो मान्य करावा, असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे," असं कुरुंदकर सांगतात.

"दुसरं असं समर्थन आहे की स्मृती या वेदावर आधारित असतात आणि मनुस्मृती वेदसंगत असल्यामुळे मनुस्मृती वंदनीय आहे. पीठांचे शंकराचार्य, मठाधीश हे लोक याच आधारे मनुस्मृतीचं समर्थन करतात, असा दुसरा गट आहे. तिसरा गट आधुनिक समर्थकांचा आहे. आधुनिक शिक्षण घेतलेले हे लोक म्हणत की किरकोळ बाबी वगळल्या तर मनूची भूमिका ही समाजकल्याणकारी होती असा हा गट मानतो," असं कुरुंदकरांनी त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केलं आहे.

'कायदा लिहिणारी पहिली व्यक्ती'
संभाजी भिडे यांनी मनू हा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ होता असं म्हटलं. त्यावेळी केलेल्या भाषणात भिडे म्हणाले मनूने विश्वकल्याणासाठी हा ग्रंथ लिहिला होता.
मनू हा महान कायदेपंडीत होता. म्हणून त्याचा पुतळा राजस्थान हायकोर्टाबाहेर लावण्यात आल्याचं वारंवार सांगितलं जातं.

"हा पुतळा जयपूरच्या बार असोसिएशननं उभारला आहे. त्यावेळी बार असोसिएशनमध्ये बहुतांश वकील हे उच्चवर्णीय होते त्यांनी या पुतळ्यासाठी हट्ट धरला. पहिल्यांदा कायदा लिहिणारा मनू आहे असं सांगून हा पुतळा उभा केला," असं राजस्थानमधील दलित चळवळीच्या कार्यकर्ते पी. एल. मीठरोठ यांनी बीबीसीला सांगितलं.

सनातन संस्था देखील मनुस्मृतीचं समर्थन करते. मनुस्मृती जाळावी की अभ्यासावी या ग्रंथाची निर्मिती सनातन संस्थेनं केली आहे. मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसार राज्यव्यवस्था अस्तित्वात होती असा दावा सनातननं केला आहे.

नित्शे या जर्मन तत्त्ववेत्यावर मनुस्मृतीचा विलक्षण प्रभाव होता असं देखील सनातननं म्हटलं आहे. मनुस्मृतीमध्ये जातीयवादाचा उल्लेख नसल्याचं देखील सनातन म्हणतं.

'आधुनिक विद्येने आधुनिक मन तयार झालं नाही'
"आधुनिक विद्येने आधुनिक मन या मंडळीच्या ठिकाणी निर्माण झाले नाही, मन तेच सनातनी आणि परंपराप्रिय राहिले. उलट आधुनिक विद्येने परंपरा समर्थनाचे नवे युक्तिवाद मात्र उपलब्ध झाले," अशी खंत कुरुंदकर व्यक्त करतात.

पुढे कुरुंदकर सांगतात, "याच गटाविषयी डॉ. आंबेडकरांच्या मनात संताप आणि तुच्छता होती. परंपरावादी मन बदलण्यात शिक्षण तर अयशस्वी झालेच. परंपरांचं समर्थन करण्यासाठी या गटाच्या हाती आधुनिक ज्ञान एक साधन म्हणून उपलब्ध झालं असं बाबासाहेबांना वाटे. आंबेडकरांनी हा गट जातीय हितसंबंधांचा रक्षक आणि दांभिक वाटे."
-०-