आरमोरी: सोनोग्रॉफी केंद्र दररोज सुरू ठेवावी



अन्यथा उपोषण- माजी पं.स.उपाध्यक्ष चंदू वडपल्लीवार

आरमोरी : आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या पाहिजे त्या सोयी सुविधेचा अभाव असुन येथे गरोदर मातांना व पोटाचा त्रास असलेल्या रुग्णासाठी आवश्यक असलेली सोनोग्राफी ची सोय महीन्यातुन फक्त दोनच दिवस आहे. नियमित दररोज सोनोग्राफी ची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा पंचायत समिती आरमोरीचे माजी उपसभापती चंदु वडपल्लीवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातुन दिला आहे.

आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले. परंतु आरोग्याच्या पाहिजे त्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. रूग्णालयाला आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग पुरेश्या प्रमाणत राहत नाही तर कधी सोई सुविधा अपुऱ्या असतात


. आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या दवाखान्यात आरमोरी तालुक्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत असतात. या उपजिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण विविध प्रकारच्या उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सोनोग्राफीची सोय आहे, परंतु ही सेवा महिन्यातून केवळ दोनच दिवस दिली जात असल्याने रुग्णालयात रुग्णांची गर्दी उसळते. परिणामी बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांचे हाल होतात वेळेवर उपचार न करता वापस जावे लागते.

येथे पोटाचे विविध विकार असलेले रुग्ण तसेच गरोदर तर कधी महिला येथे येतात. पोटाच्या सोयी सुविधा विकारांवर उपचार करण्याअगोदर सोनोग्राफी करावयास डॉक्टर सांगतात. सोनोग्राफीची सेवा ठराविक दिवशी असल्याने नियमित दररोज सोनोग्राफीची सेवा उपलब्ध नसल्यामुळे रूग्णाला खाजगी सोनोग्राफी सेंटर मध्ये जाऊन उपचार करावा लागतो. खेडेगावातील तसेच गोरगरिब रुग्णाला हे परवडणारे नाही. परंतु पयार्य नसल्याने रुग्णाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र नियमित दररोज सुरू ठेवावे अन्यथा उपोषण करणार असा ईशारा माजी पं.स. उपसभापती वडपल्लीवार यांनी दिला आहे. (ता. प्र. )