अन् त्यांनी केला भुताच्या जागेवर वाढदिवस साजरा


सोलापूर: सोलापुरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने अमावास्येला स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. अंनिसच्या वतीने स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यात आला. अमवास्येला भयंकर असा अंधार असतो आणि अमावास्या असताना स्मशानभूमीबाबत अनेकांच्या मनात भीती असते. अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, स्मशानभूमीत काहीही नसते, याबाबत अंनिसने जनजागृती केली.

सोलापूर शहरात रविवार पेठ येथे असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अमावस्येला स्मशानसहल आयोजित करण्यात आली होती. स्मशानसहलीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मशानभूमीत वाढदिवस देखील साजरा करत, अनेक बाबींचा उहापोह केला. स्मशानभूमी बाबत अनेकांच्या मनात , भूत, आत्मा, चेटकीण, डायन अशा भीतीदायक गोष्टी आहेत. ही भीती नाहीशी करण्यासाठी स्मशानसहल आयोजित करण्यात आली होती.

अमावस्येच्या मध्यरात्री स्मशानभूमीत वाढदिवस साजरा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू स्मशानभूमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला. अमावस्या असेल तर अनेक नागरिक स्मशानभूमीत जात नाहीत किंवा त्यांच्या मनात नकारात्मक माहिती दडली आहे. ही नकारात्मक बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मशानभूमीत विविध उपक्रम केले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत केक आणून खाल्ला.

भानामतीचे प्रयोग सादर करत हातचालीखे धडे सादर केले

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती कार्यक्रम घेतला. मांत्रिक हे हातचलाखी करत लोकांना भूलथापा मारत त्यांची लुबाडणूक करतात. जादूचे कारनामे दाखवून चमत्कार करतात. मांत्रिका प्रमाणे चमत्कार आणि जादूचे प्रयोग अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अमावस्येला मध्यरात्री हिंदू स्मशानभूमीत करून दाखवले. नारळामधून बांगडी काढणे, लाल कापड काढणे, रिकाम्या पातेल्यातून पाणी काढून लोकांची कशी फसवणूक करतात याचे प्रयोग दाखवण्यात आले. गोमूत्र नारळावर टाकून आग लावण्याचा प्रयोग देखील दाखवण्यात आला. यावेळी भानामतीला लागणाऱ्या वस्तू,लिंबू,नारळ आदी साहित्य घेऊन अनिसने जनजागृती केली.

विविध जादूचे प्रयोग केले

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी रात्री अक्कलकोट रोड येथील सार्वजनिक स्मशानभूमीत विविध जादूचे प्रयोग सादर करून जनजागृती करण्यात आली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ब्रह्मानंद धडके यांचा रात्री बारा वाजता स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करून वेगळा संदेश देण्यात आला. अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत भुते दिसतात, स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जा असते, भुताचे पाय उलटे असतात, आधी प्रश्नांवर लोकांना माहिती देऊन विविध जादूचे प्रयोग करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या स्मशान सहल कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बाळगावकर, प्रधान सचिव ब्रह्मानंद धडके, कार्याध्यक्ष शंकर खलसोडे , श्रीमती भोसले, लोखंडेकर , विजय जाधव , सना जोशी, धनाजी राऊत , उषा धडके, यशवंत फडतरे, अनिल धडके आदी उपस्थित होते.