भाईजानच्या घरी एकनाथ भाई; मुख्यमंत्र्यांनी घेतलं सलमानच्या बाप्पांचं दर्शन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगणेशोत्सव काळात पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असतात. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरीही ते बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. यंदाही मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवात बाप्पांच्या दर्शनासाठी अनेकांच्या घरी दौरा सुरू केल्याचे दिसून येते.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतिर्थ बंगल्यावर त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानची बहिण अर्पिता हिच्या घरी राजकारणातील भाई म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.

सलमान खानच्या घरीही सोमवारी बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती होत आहे. आपल्या लाडक्या भाचीसह सलमान बाप्पांची आरती करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर, उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरीही बाप्पांच्या आगमनासाठी सलमान खान आवर्जुन उपस्थित होता. त्यामुळे, गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींच्याही घरी राजकीय नेते आणि दिग्गजांची उपस्थिती दिसून येते. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांसमोरही सलमानचा हाताच्या गुंड्या सोडून बॉडी बिल्डर स्टाईल स्वॅग दिसून येतो. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सलमानच्या आईंना वाकून नमस्कार केला. तर, सलमानची बहिण अर्पिता हिने मुख्य्मंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी काही वेळ सलमानच्या मातोश्रींसोबत संवादही साधल्याचे व्हिडिओत दिसत आहे.