गणेशोत्सवात बेभान होऊन नाचू नका! डॉक्टरांनी सांगितला गंभीर धोका, भक्तांसाठी महत्त्वाची सूचना


मुंबई: दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन झालं आहे. आज पाच दिवसांचे बाप्पा भक्तांचा निरोप घेतील. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्त बाप्पांचं विसर्जन करतील. विसर्जन सोहळ्यात अनेक जण ठेका धरतात. पण सध्याची परिस्थिती पाहता हृदयरोग तज्ज्ञांनी सगळ्यांनाच थोडं जपून राहण्याचा सल्ला दिला आहे. विसर्जन मिरवणुकीत बेभान होऊन नाचणं टाळा, असं आवाहन करत डॉक्टरांनी काळजी घेण्यास सांगितलं आहे. हायपरटेंशन आणि डायबीटिज रुग्णांनी खास काळजी घेण्याची सूचना डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ९ सप्टेंबरला मुंबईच्या कांदिवतील विसर्जन मिरवणुकीत नाचताना अरुण सिंह नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशच्या श्री सत्य साई जिल्ह्यात प्रसाद नावाचा २६ वर्षीय गणपती मंडपात नाचता नाचता कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदय विकाराच्या झटक्यानं त्याचा जीव गेला.


शारीरिक हालचाल कमी असलेल्यांनी विसर्जन मिरवणुकीत बेभान होऊन नये नाचू नये, तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सायन रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोज तज्ज्ञ डॉ. प्रशांत मिश्रा यांनी बेभान नाचताना शरीरात नेमकं काय घडतं ते उलगडून सांगितलं. 'जंक फूडचे सेवन आणि फारशी शारीरिक हालचाल न करणाऱ्या तरुणांच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. अशा व्यक्ती बेभान होऊन नाचल्यास एड्रेनालाईन नावाचं मोठं स्पंदन तयार होतं. त्यामुळे रक्तदाबासोबत हृदयगती वाढते. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि मृत्यू होण्याची शक्यता असते,' असं मिश्रा यांनी सांगितलं.


स्मार्टवॉचमध्ये हृदयाचे ठोके प्रति मिनिटाला १०० पेक्षा अधिक दिसत असल्यास आराम करा, असा सल्ला नायर रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. राजेश जोशींनी दिला. हृदयाचे ठोके वाढल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. अशा प्रसंगी गणेश मंडळांनीदेखील काळजी घ्यावी. एखाद्याला श्वास घेण्यात अडचणी येत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास त्याला तातडीनं रुग्णालयात न्यावं, असा सल्ला जोशींनी दिला.