नागपूर : धार्मिक स्थळाजवळ घर असलेल्या विधवा महिलेच्या सौंदर्यावर भाळलेल्या एका अभियंता तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिचे दोन वर्षे लैंगिक शोषण केले, या प्रकरणी विधवेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमित गजानन गाठे (२९, बोर्डी, ता. अचलपूर. जि. अमरावती) असे आरोपी युवकाचे नाव आहे. पीडित २९ वर्षीय विधवा रजनी (बदललेल नाव) ही आईवडिलांसह राहते. तिच्या पतीचे अपघातात निधन झाले होते. आरोपी अमित गाठे हा अभियंता असून नागपुरातील एका कंपनीत नोकरी करतो. तो दर आठवड्यात प्रार्थना करायला धार्मिक स्थळावर जात होता. त्या प्रार्थनास्थळाच्या बाजुला पीडित विधवा रजनीचे घर आहे.
रजनीच्या घरी पाणी प्यायला गेल्यानंतर दोघांची ओळख झाली. रजनीच्या सौंदर्यावर तो भाळला. ती विधवा असून एकाकी असल्याचे हेरून अमित हा दरआठवड्याला रजनीच्या घरी जायला लागला. विधवा असल्यामुळे त्याने रजनीशी मैत्री केली. काही दिवसांतच रजनीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. रजनीच्या घरी कुणी नसताना तो घरी आला. त्याने रजनीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, त्याने पुढच्या महिन्यात लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
गेल्या दोन वर्षांपासून अमित हा रजनीचे लैंगिक शोषण करीत होता. त्याने लग्न करण्यास नकार देत नातेवाईक तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या रजनीने यशोधरानगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.