गडचिरोली: प्रसूतीनंतर २ महिलांचा मृत्यू; गडचिरोली महिला रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, नातेवाईकांचा संताप


गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळांना जन्म दिल्यानंतर या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गडचिरोली (Gadchiroli) शहरातील शासकीय महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी दोन महिला दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर काल बुधवारी सिजेरियन शस्त्रक्रिया पार पडली. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळानंतर दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

दोन्ही महिलांनी जन्म दिलेल्या बाळांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु महिलांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप समोर आले नसून याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर माधुरी किलनाके यांनी दिली आहे.


दरम्यान, गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात गडचिरोली तसेच लगतच्या चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. अशा स्थितीत अनेक रुग्ण खाली झोपून उपचार घेतात. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात महिला आणि बालमृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)