खोटं बोलणारा माणूस कसा ओळखायचा?


द्वारा BBC

लंडनमधील मानसोपचार तज्ज्ञ तसंच युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समधले प्राध्यापक थॉमस ऑर्मेरॉड यांनी आपल्या पथकातील सुरक्षा अधिकाऱ्यांना एक अशक्यप्राय आव्हान दिलं. युरोपातील विविध विमानतळांवर दाखल होणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मुलाखती घेणं, त्यांच्या प्रवासाचं नियोजन याबाबत चौकशी करणं हे काम त्यांना देण्यात आलं.

ऑर्मेरॉड यांनी या प्रवाशांमध्ये चुकीची माहिती असणारे काही प्रवासीही पाठवले. चुकीची माहिती दिलेल्या या प्रवाशांना त्यांचे सुरक्षा अधिकारी ओळखू शकतात किंवा नाही हे ऑर्मेरॉड यांना पाहायचं होतं. खरंतर 1 हजार प्रवाशांमागे फक्त एकच असा खोटा प्रवासी येणार होता. त्याला पकडणं म्हणजे गवताच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं अवघड काम होतं.


मग, त्यांनी काय केलं? शारीरिक हालचाली, डोळ्यांचे हावभाव यांच्यावरून खोटं बोलणारा माणूस शोधण्याचा एक पर्याय होता. पण ही पद्धत इतकी खात्रीशीर नाही. चेहऱ्यावरचे हावभाव आणि हालचालींवरून खोटं बोलणारा व्यक्ती शोधण्यात अनेक प्रशिक्षित पोलीस अधिकारीसुद्धा चुकू शकतात हे अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे. 20 हजारपैकी फक्त 50 व्यक्तींवर ही पद्धत लागू पडल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये खोटं बोलणाऱ्याचा खोटेपणा त्याच्या चेहऱ्यावरून, नाकाला हात लावण्यावरून, गालांच्या हालचाली, दबकं हास्य किंवा डोळ्यांतील भावावरून ओळखण्यात येत होता. पण ऑर्मेरॉडच्या पथकाने थोडंसं वेगळं करायचं ठरवलं.

ऑर्मेरॉड सांगतात, "मानवी स्वभावात प्रचंड विविधता आढळून येते ही खरी समस्या आहे. एखादा व्यक्ती खोटं बोलत असताना तुम्ही त्याची युक्ती ओळखू शकता, पण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत अशा प्रकारे ओळखणं कठीण आहे. फसवणूक करणाऱ्याला नेहमीच ओळखता येईल, अशी कोणतीही चिन्ह नाहीत.

"मी घाबरून हसतो, दुसऱ्या व्यक्ती गंभीर होतात, काहीजण डोळ्यांत डोळे घालून पाहू शकतात. काही जण ते टाळतात. सत्य आणि असत्य याचा फरक ओळखू शकणाऱ्या युक्त्या खात्रीशीर नाहीत," ते सांगतात.

असं असलं तरी पूर्वापार चालत आलेल्या संकेतांच्या आधारावरच आपली सुरक्षा अवलंबून आहे. लांब पल्ल्याच्या विमानप्रवासावरून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीबाबत थोडासा विचार करा.

2012 च्या लंडन ऑलिंपिकवेळी ऑर्मेरॉड यांना ही तपासणी करण्यासाठी सांगितलं होतं. ते सांगतात, त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रवाशांसमोर फक्त एक प्रश्नावली ठेवली होती. त्यामध्ये हो किंवा नाही अशी उत्तरं देता येतात.

त्यातूनच संशयास्पद हालचाली टिपण्याचं आव्हान अधिकाऱ्यांसमोर असतं. यामध्ये ते काय म्हणतात, ते ऐकून घेण्याची संधी नसते. त्यांची विश्वासार्हता समजून येत नाही. तसंच स्वभावातला बदलसुद्धा टिपता येऊ शकत नाही. खोटेपणा शोधण्यासाठी हे अवघड आहे.

म्हणूनच खोटं बोलणारी व्यक्ती शोधण्यासाठी नवी पद्धत गरजेची आहे. पण ती पद्धत नेमकी कशी असावी? या प्रश्नावर ऑर्मेरॉड यांचं उत्तर अगदी सोपं आहे. ते सांगतात, व्यक्ती बोलत असलेल्या शब्दांच्या सूक्ष्म पद्धतींवरून लक्ष्य थोडसं बाजूला करा. ते जोर देऊन सांगत असलेल्या शब्दांवर अडकून पडू नका.

कुणी खोटं बोलत आहे का हे शोधण्यासाठी ऑर्मेरॉड आणि त्यांचे सहकारी युनिव्हर्सिटी ऑफ वॉल्हरहॅम्पटनमधले कोराल डँडो यांनी एक चाचणी बनवली आहे. याचा आधार घेऊन आपण स्वतःच लाय डिटेक्टर टेस्ट घेऊ शकता.

थेट प्रश्न

खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या जाळ्यात अडकवण्यासाठी थेट प्रश्न विचारणं आवश्यक आहे. कोणताही विषय खोटं बोलत विस्तार करून सांगणं अवघड असतं.

चकित करा

तपासणी करणाऱ्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या आकलनक्षमतेवर भार निर्माण होईल असा प्रश्न करावा. किंचित गोंधळात टाकणारे अनपेक्षित प्रश्न किंवा त्या विषयासंबंधी मागच्या काळातील प्रसंग विचारणं अशा प्रकारच्या प्रश्नांमुळे खोट्या व्यक्तीला आपला खोटेपणा टिकवणं अवघड जातं.

छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण

जर एखाद्या प्रवाशाने युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण झाल्याचं सांगितलं तर त्याचा विद्यापीठ ते कामापर्यंतचा प्रवास कसा राहिला हे विचारलं पाहिजे. त्याने सांगितलेल्या माहितीत एखादा विरोधाभास आढळला, तर नक्कीच हा खोटेपणा असू शकतो.

तसंच खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास थोडासा वाढू द्या. त्यानंतर तो त्याची चूक दुरूस्त करण्याऐवजी जास्तच खोटं बोलू लागतो. यातील चूक पकडणं तुम्हाला सोपं जाऊ शकतं.

स्वभावात बदल

एखाद्या बाबतीत आव्हान दिल्यानंतर त्यांच्या स्वभावातील बदल हा खोटेपणा पकडण्यासाठी महत्त्वाचा असतो. अशावेळी समोरचा व्यक्ती खोटेपणा लपवण्यासाठी पाल्हाळ बोलू शकतो. पण पुन्हा नियंत्रण गमवून बसल्याचं कळताच ते शांत होऊ शकतात.

दबावाखाली गेल्यानंतर खोटारडी व्यक्ती चिडचिडेपणा दाखवून त्या विषयापासून स्वतःला वेगळा करायचा प्रयत्न करू शकतो.

या सगळ्या युक्त्या एखाद्या कॉमन सेन्सप्रमाणे असल्याचं वाटू शकतात, पण याचा उपयोग योग्य प्रकारे झाल्याचं ऑर्मेरॉड सांगतात.