प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई
विक्रोळी, दि. १ : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व शारीरिक शिक्षण उपविभागाच्या वतीने मनपा माध्यमिक शाळांच्या परिमंडलिय कुस्ती स्पर्धांचे आयोजन विक्रोळी येथील वर्षानगर एम. पी. एस. शाळा सभागृहात करण्यात आले होते. १४ व १७ वर्षा आतील जवळपास १५० मुला- मूलींनी सहभाग नोंदवला. बांगडी, मोळी, ढाक या कुस्तीतील डावांचा मुलांनी प्रामुख्याने वापर केला. या स्पर्धांमधील यशस्वी झालेले प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक महापालिका अंतिम कुस्ती स्पर्धांसाठी पात्र ठरणार आहेत.
स्पर्धांचे उदघाटन परिमंडळ क्र. ३ चे प्रमुख - कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मनपा वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे उपस्थित होते. याप्रसंगी कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर, रघुनाथ सोनवणे, सुभाष पाटील, रवींद्र पाटील, विद्यार्थी, पालक, शारीरिक शिक्षण शिक्षक, प्रशिक्षक, मुख्याध्यापक व बहुसंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेले कनिष्ठ पर्यवेक्षक सतिष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून यशवंत कुंभार, सुरेंद्र मोरे, भालचंद्र यादव, प्रिया पेंडुलकर, ओमप्रकाश पांडे व नितीन महाडिक यांनी उत्तमरित्या काम पाहिले.
मुलांना खेळताना इजा झाल्यास तातडीने उपचार व्हावेत म्हणून महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष सूर्यकर, कनिष्ठ आरोग्य प्रचारक विजया शिरोळे व कर्मचारी भरत नवले हे आवर्जून उपस्थित होते.
स्पर्धांचे प्रास्ताविक कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण शिक्षक अर्जुन बनकर यांनी केले.