पार्थिव नेणारी स्कॉर्पिओ उलटल्याने एक ठार
 मूल : चंद्रपुरातून मृत कामगाराचे पार्थिव छत्तीसगडमध्ये नेणारी स्कॉर्पिओ उलटल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना मूल चंद्रपूर मार्गावरील जानाळा येथे मंगळवारी (दि. २९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन मोहन साखरे (वय ३०, रा. बुटाई, ता. अर्जुनी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. जखमी तिघांना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

चंद्रपूरलगतच्या पडोली - लखमापूर कोळसा डेपोतील कामगार केशवराव यादव (६०) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचा मृतदेह छत्तीसगडमधी बोहरमभेडी येथे नेण्यासाठी नातेवाईक छगनलाल साहू व इतर दोघे स्कॉर्पिओने निघाले होते. दरम्यान,

चालक अश्वजित रूपचंद सहारे (२६) रा. दुर्गापूर याचे नियंत्रण सुटल्याने जानाळाजवळील पुलाला जोरदार धडक देऊन स्कॉर्पिओ तीनदा उलटली. यात सचिन साखरे याचा जागीच मृत्यू झाला; तर छगन किरपाराम साहू (रा. मोहरमबेडी अंबागड, चौकी छतीसगड) व अन्य तिघे जखमी झाले. मूल पोलिसांनी अपघातातील जखमी व मृताला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने अखेर पोलिस वाहनातूनच सर्वांना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविले. जखमींवर उपचार सुरू आहे तर अन्य वाहनाने दोघांचे मृतदेह गोंदिया व छत्तीसगडला रवाना करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी करीत आहेत.