कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मात्र…; नैराश्य आल्याने तरुणीची आत्महत्या



नागपूर : खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या परीचारिकेने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. मात्र, प्रेमविवाह अयशस्वी ठरल्याने तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमरन लक्ष्मण महाकाळे (२२, रामटेक नगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सीमरन महाकाळे ही बेसा येथील एका पॅथॉलॉजीमध्ये नोकरीवर होती. दरम्यान तिची अक्षय नकोसे या युवकाशी ओळख झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शविला. त्यामुळे सीमरन आणि अक्षय यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर सीमरनने नर्सिग कोर्सला प्रवेश घेतला. दरम्यान तिचे आणि पतीचे पटत नव्हते. चारित्र्याच्या संशयावरून पती मारहाण करीत असल्याची तक्रार ती आईकडे करीत होती. त्यामुळे ती माहेरी परत आली. ती प्रेमविवाह टिकू न शकल्याने नैराश्यात गेली.


ती एकाकी राहायला लागली. त्यानंतर तिची एका युवकासोबत ओळख झाली. त्या युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवर वाद झाला. त्यामुळे ती निराश होती. सिमरनने शुक्रवारी सायंकाळी घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.