जळगाव शहरातील रस्ते, गटार भयंकर वाईट समस्या बनली आहे.ती सोडवण्यासाठी नगरसेवक अपयशी ठरलेले आहेत.आमदार अपयशी ठरलेले आहेत.मतदार मत विकत देतात तर आपण मत विकत घेऊन सहज निवडून येऊ ,या भ्रमात नगरसेवक , आमदार राहिले.अनुभव सुध्दा तसाच आहे.काही नगरसेवक तर पिढ्या दर पिढ्या निवडून येत आहेत.काही तर नवरा बायको,पोरगा निवडून आले आहेत.काही तर वीस पंचवीस वर्षे नगरसेवक निवडून आल्याने ते आता पेन्शन साठी पात्र ठरलेले आहेत.ही लोकशाही ची खूप मोठी विटंबना आहे.म्हणूनच आज जळगाव भकास झालेले आहे.यावर आम्ही जळगाव जागृत जनमंच उपाय सुचवला आहे.
जळगाव मधील कोणत्याही प्रभाग मधे जा, कोणत्याही कॉलनीत जा,तेथे चंद्रावरचे सारखे रस्ते आहेत.गटार गंगा तर घरात शिरते.रायसोनीनगर, शिवाजीनगर,धनाजी काळे नगर, राजमालतीनगर, सुप्रीम कॉलनी, हरिविठ्ठलनगर,खोटेनगर , कांचननगर अशी कोणतीही कॉलनी शहरातील वस्तीसारखी वाटत नाही.तांबापुरा मधील मानव निर्मित गटार तर पार घरात शिरून माणसांना बाहेर घेऊन आली.खाट गोदळी वाहून नेली.तरीही तेथे नगरसेवकांनी ,आमदारांनी स्वताची पाठ थोपटलेले बैनर, बोर्ड,थडगे बांधलेले आहेत.
जळगाव मधील मध्यवर्ती बाजार पेठ,गांधी मार्केट मधे साठ फुटाचा रस्ता फक्त वीस फूट डांबरीकरण करून सोडून दिला.काव्यरत्नावली ते वाघनगर रस्ता तर अर्धा बनवून तसाच वाऱ्यावर सोडून दिला.अनुराग स्टेट बँक कॉलनीतील सिमेंट रस्ता फक्त चार महिन्यांत उखडला.हरिविठ्ठल मधील मुख्य रस्त्यावर तर चांद्रयान-३ उतरू शकणार नाही.चालवले तर खड्यात अडकून पडेल.तरीही तेच नगरसेवक पांच पांच वेळा निवडून येतात.पंच्यात्तर वर्षात येथे लोकशाही रूजली नाही.अफ्रिकेतील युगांडा,केनिया, सोमालिया पेक्षा जास्त मागास भाग भारतात जतन करून ठेवलेला आहे.
या परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.येथील मतदार सरळ सरळ मत विकतो.विकतो म्हणजे कोणी मागितले तेंव्हा,असे नव्हे.तर उमेदवारांच्या घरी जाऊन मतदान कार्ड गहाण ठेवून पैसे घेतो.तब्बल वीस लाख असेच वाटप होतात.त्यामुळे नगरसेवक बिनधास्त पणे निवडून येतात.
आता या नगरसेवकाँनी पांच वर्षे काहीच काम केले नाही.तर मग,ती उणीव भरून काढण्यासाठी, मतदारांना खुष करण्यासाठी आता गणपती मंडळांना सढळ हाताने देणगी देत आहेत.काही टारगट पोरांना हाताशी धरून आपल्या प्रभाग मधे गणपती बसवत आहेत.आतापासून स्वताचा फोटो लावलेली गाडी प्रभाग मधे फिरवत आहेत.गणपतीचे निर्माल्य यात टाका.यामुळे नागरिकांचा समज होईल कि,याच सज्जन आणि सभ्य माणसाला निवडून द्यावे.पण आता नागरिक कामचोर नगरसेवकांवर खूप नाराज आहेत.पांच वर्षे तोंड दाखवले नाही आणि आता फोटो लावून मिरवत आहेत.आता यांना अद्दल घडवणारच.
या कामाचा शुभारंभ केला तो रायसोनीनगर मधील नागरिकांनी.पुर्ण कॉलनीतील लोकांनी एकच गणपती बसवण्याचे नियोजन केले आहे.कोणीही नगरसेवकांकडून वर्गणी ,देणगी न घेता स्वखर्चाने गणपती उत्सव साजरा करणार आहेत.नगरसेवकांवर बहिष्कार टाकलेला आहे.हा आहे गांधीजींचा मार्ग.यात काहीच कठीण नाही.पण परिणाम मात्र महाभयंकर होऊ शकतो.कोणताही नगरसेवक पुन्हा निवडून न देण्याचा हा निर्धार आहे.
जळगाव जागृत जनमंच ने शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे कि,आपला सण,आपला उत्सव आपण आपल्या परीने साजरा करा.आपली हौसमौज आपण आपल्या ताकदीने पुरी करा.आपली संस्कृती आपण जतन करा.पण नगरसेवकाँच्या देणगीच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका.हजारो वर्षांपासून आपले सण, उत्सव आपण आपल्या ताकदीने साजरा करीत होतो.तेंव्हा कुठे आमदार आणि नगरसेवक होते? तरीपण संस्कृती जपलीच.परकियांचे,लुटारूंचे अनेक हल्ले ,हमले भारतावर झाले.तरीही संस्कृती कोलमडून पडली नाही.टिकवलीच.तर मग,हे कोण दिड दमडीचे भुरटे चोर! ज्यांच्या मुळे आमचा उत्सव ,आमचा उत्साह कमी होईल?देणगी घेऊन लाचारी नको.देणगी घेऊन गुलामी नको.देणगी घेऊन मुस्कटदाबी नको.आपला गणपती उत्सव स्वाभिमानाने साजरा करा.तरच थोडेफार पुण्य लाभेल.चोरांच्या,वाटमाऱ्यांच्या देणगीने राममंदिर बांधले तर तेथे राम कधीच थांबणार नाही.चोरांच्या ,लुटारूंच्या देणगी ने गणपती बसवला तर गणेशाची प्राणप्रतिष्ठा होणारच नाही.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव