बेतकाठी येथे विद्युत तार अंगावर पडून शेतकरी ठार

 कोरची : विद्युतपंप सुरू होईना म्हणून बांबूच्या साहाय्याने तारेला छेडछाड करताना ती तुटून अंगावर पडली, यावेळी विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार झाला. ही घटना बेतकाठी येथे ४ ऑगस्ट रोजी घडली.

रामाधीन आनंदराव पोटावी (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ४ ऑगस्ट रोजी ते शेतातील पंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र, वीजपुरवठा सुरू न झाल्याने बांबूच्या साहाय्याने तार हलविण्यासाठी ते गेले. यावेळी तार तुटून त्यांच्या अंगावर पडली, यात रामाधीनचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयाचा टाहो

सायंकाळी ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता, ते शेतात मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयत रामाधीन पोटावी हे आदिवासी विविध कार्यकारी संस्था बेचकाटीचे माजी उपसभापती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगी असा परिवार आहे.

शनिवारी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. आशिष इटनकर यांनी शवविच्छेदन केले. सहायक निरीक्षक गणेश फुलकवर अधिक तपास करत आहेत.