'पैसे दया अन् दारू विका' असे म्हणणारे पोलीस सापडले




औंध (सातारा) : दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्‍याप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्या‍त मदत करण्‍याबरोबरच यापुढील कोणत्‍याही स्वरूपाचा त्रास न देण्‍याच्‍या बदल्‍यात एक लाखाची लाच स्‍वीकारत असताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औंध पोलिस ठाण्‍यातील (Aundh Police Station) सहायक निरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षकास ताब्‍यात घेतले.

दत्तात्रय दराडे आणि बापूसाहेब जाधव अशी त्‍या दोघांची नावे आहेत. औंध पोलिस ठाण्‍यात सहायक निरीक्षकपदी दत्तात्रय परशुराम दराडे आणि सहायक उपनिरीक्षकपदी बापूसाहेब नारायण जाधव हे दोघे कार्यरत होते. या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत मध्‍यंतरीच्‍या काळात बेकायदेशीर दारू वाहतूक करत असताना एक कारवाई करण्‍यात आली होती.

या कारवाईदरम्‍यान दारू वाहतूक करणाऱ्यांसह वाहन व दारू असा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला होता. या दाखल गुन्ह्याच्‍या तपासादरम्‍यान मदत करण्‍याबरोबरच तसेच यापुढील काळात कोणत्‍याही स्वरूपाचा त्रास न देण्‍याच्‍या बहाण्‍याने दत्तात्रय दराडे आणि बापूसाहेब जाधव यांनी त्‍यातील संशयितांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली.



तडजोडीअंती त्‍या दोघांनी एक लाख रुपये लाच स्वरूपात घेण्‍यास मान्‍यता दिली. याची तक्रार दाखल गुन्ह्यातील संशयिताने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Satara Anti-Corruption Department) नोंदवली. या तक्रारीची शहानिशा करत दराडे, जाधव यांना लाच घेताना पकडण्‍यासाठीचा सापळा औंध येथील बाजार पटांगण परिसरात रचण्‍यात आला. सापळ्यादरम्‍यान त्‍या दोघांना एक लाखाची लाच घेताना पकडण्‍यात आले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दराडे आणि सहायक उपनिरीक्षक जाधव या दोघांवर गुन्‍हा नोंदविण्‍याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत औंध पोलिस ठाण्‍यात सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, कर्मचारी नीलेश चव्हाण, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी केली.


शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास त्वरित आमच्याशी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.-उज्ज्वल वैद्य, पोलिस उपअधीक्षक, सातारा.