आरमोरी: जोगीसाखरा आरमोरी, वैरागड, देलनवाडी,मानापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खत विकले जात असून सध्याच्या घडीला खताच्या किमतीपेक्षा जवळपास १०० रुपये अधिक दराने खताची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. सदर बाबीकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे व संबंधितांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने खताचा स्टॉक सार्वजनिक करावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यात किती खत आला ही माहिती प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरवावी. तसेच युरिया खत न मिळाल्यास तात्काळ कृषी अधिकारी यांना फोन करून कोणत्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे हे शेतकऱ्यांनी विचारावे.
आरमोरी तालुक्यात, जिल्ह्यात ठोक व चिल्लर कृषी केंद्र आहेत. काही खत विक्रेत्यांकडे खतांचा साठा खताची किमतीचा फलक उपलब्ध नाही. त्यामुळे अतिशय मागणी असलेला युरिया खत गोडाऊन मध्ये असतानाही शेतकऱ्यांना मिळत नाही. मिळालाच तर खतासोबत इतर रासायनिक खते आणि एका औषधाची बॉटल शेतकऱ्याच्या माथी मारली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडत आहे. खत विक्रेत्याकडून खताचे बिल कधीच मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.