मुलीची हत्या करुन आईने खाल्ला शरीराचा भाग; मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले


ब्राझीलमधून (Brazil) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. ब्राझिलमध्ये एका निर्दयी आईने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या हत्येपूर्वी आईने मृतदेहाचे तुकडे कसे करावे हे शिकण्यासाठी इंटरनेटवरुन माहिती मिळवली होती. त्यानंतर आरोपी आईने 21 दिवस मुलीच्या मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये (refrigerator) ठेवले होते. आरोपी महिलेच्या प्रियकराच्या आईला हा सगळा प्रकार कळल्यानंतर तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी 30 वर्षीय रुथ फ्लोरियानोला शनिवारी साओ पाउलोमधून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरिआनोने मुलगी अॅलेनी सिल्वाचे तुकडे करण्याचा सोपा मार्ग शोधण्यासाठी इंटरनेटवरुन माहिती मिळवली होती. फ्लोरिआनोने सांगितले की तिचा प्रियकर ब्रेकअप करण्यास नकार देत होता त्यामुळे तिने अॅलेनी सिल्वाची हत्या केली. कारण तिच्या प्रियकराचे सिल्वावर प्रेम होते म्हणून फ्लोरिआनोने तिला संपवलं. सिल्वाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर फ्लोरिआनोने ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. मात्र जेव्हा फ्लोरिआनोच्या प्रियकराची आई तिच्या घरी गेली तेव्हा तिला नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये सापडला

पोलिसांच्या चौकशीत फ्लोरिअनोने सांगितले की, तिला महिन्याभरापूर्वी डेटिंग अॅपवर एक व्यक्ती भेटली होती. फ्लोरिअनोने त्याला भेटायला घरी बोलवलं होतं. त्यानंतर दोघांनी ड्रग्ज घेतले आणि ते एकत्र झोपी गेले. त्यानंतर जेव्हा ती उठली तेव्हा सिल्वा आधीच मरण पावली होती. फ्लोरिअनोने सिल्वाला आपण मारले नसल्याचा दावा केला आहे. मात्र सिल्वाच्या मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचे तिने कबूल केले

त्यानंतर पुन्हा पोलिसांच्या चौकशीत फ्लोरियानोने सांगितले की तिने अंमली पदार्थांचे सेवन केले आणि सिल्वाला मारण्याचा निर्णय घेतला. दात घासत असताना सिल्वाला शस्त्राने भोसकले आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये भरले. त्यातील काही तुकडे हे फ्लोरियानोने जवळच्या गटारात टाकले होते. पोलिसांनी सांगितले की फ्लोरिआनोने सिल्वाच्या छातीत वार केले आणि त्याचा काही भाग शिजवल्याचे कबूल देखील केले.

या सगळ्या प्रकारानंतर फ्लोरियानो तिच्या मुलांसह 15 ऑगस्ट रोजी जुने घर सोडून साओ पाउलोच्या पश्चिमेकडील एका नवीन घरात राहण्याचा निर्णय घेतला. फ्लोरियानोने कोणाला कळू नये म्हणून रेफ्रिजरेटरला रिबनने गुंडाळले होते.

दरम्यान, सिल्वा ही फ्लोरिआनोची मुलगी होती जी साओ पाउलोमध्ये राहणाऱ्या माणसाशी पूर्वीच्या नातेसंबंधातून जन्माला आली होती. सिल्वा तिच्या आईकडे परत येण्यापूर्वी तिच्या वडिलांसोबत काही काळासाठी राहिली होती.