सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीतील घटना
सिरोंचा : गोदावरी नदीतीरावरील कालेश्वर तीर्थस्थळावर दर्शन घेण्यासाठी गेलेले युवक नदीत आंघोळ करताना खोल पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबतच्या युवकांनी केला; परंतु त्यांना यश आले नाही. नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीत घडली.
हिमांशू अरुण मोन (२०, रा. नागपूर), सुमन राजू मानशेट्टी (१७, रा. आसरअल्ली, ता. सिरोंचा) अशी मृतांची नावे आहेत. सुमन मानशेट्टी हा इयत्ता नववीत शिकत होता. तर नगरम येथील कार्तिक पडार्ला (१९), नवीन पडाल (२१) व रंजित पडाल (२०) आदी तिघांना बुडण्यापासून वाचवण्यात यश आले. गोदावरी नदीत युवक बुडाल्यानंतर स्थानिक मासेमार, पोलिस व एसडीआरएफच्या पथकाद्वारे शोधमोहीम राबविली. तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील देवस्थानाला दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी हे युवक गेले होते. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.सिरोंचा पोलिस व एसडीआरएफच्या चमुने घटनास्थळी धाव घेऊन मासेमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. सायंकाळी ५:३० वाजता युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास सिरोंचा पोलिस करीत आहे.
पोहता येत नसल्याने झाला घात
कालेश्वर येथे दर्शन घेण्याकरिता जाण्यापूर्वी आंघोळीसाठी युवक सिरोंचा तालुक्याच्या हद्दीतील गोदावरी नदीपात्रात उतरले. यापैकी एक-दोन युवकांना पोहता येत नव्हते. आंघोळ करताना मित्रांसोबत ते खोल पाण्यात गेले. यापैकी हिमांशू मून व सुमन मानशेट्टी हे अतिखोलात गेल्याने ते बुडाले. तेव्हा इतर मित्रांनी व परिसरातील लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फळाला आले नाही. सोबतचे तिघेजण कसेबसे बाहेर पडले.