गडचिरोली: कामचुकारपणा भोवला; शिपाई वगळून अख्खे उपविभागीय कार्यालय निलंबित


गडचिरोली : कार्यालयात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दप्तरदिरंगाईमुळे वैतागलेल्या अहेरी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकून नायब तहसीलदारांसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर त्रस्त नागरिकांनी वाघमारे यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले आहे.

जिल्ह्यातील अहेरी उपविभाग मागील काही वर्षांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. त्यात परिसरातील नागरिकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कार्यालयीन कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. परिणामी अनेक कामे खोळंबली होती. महिनाभरापूर्वी वैभव वाघमारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होताच कार्यालयाला शिस्त लावण्याच्या बराच प्रयत्न केला. परंतु कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
त्यामुळे उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी सोमवारी स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकून शिपाई वगळता नायब तहसीदारांसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. अहेरी हे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गाव आहे. येथील उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी दफ्तर दिरंगाईबाबत कर्मचाऱ्यांना ताकीद दिली होती, पण सोपविलेली कामे वेळेत न करणे, अनेक अर्ज व प्रकरणे प्रलंबित ठेवणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे असे प्रकार सुरुच होते, त्यामुळे लोकांमधून तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता वैभव वाघमारे हे कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नायब तहसीलदारांसह एकूण १० कर्मचाऱ्यांचा निलंबनाचे आदेश तयार केले व शिपायामार्फत ते बजावले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखविण्यात आला. शिपाई वगळता सर्वच कार्यालय रिकामे झाल्यावर कार्यालयास टाळे लावण्यात आले. सध्या वैभव वाघमारे हे आपल्या दालनात एकटेच असून बाहेर शिपाई आहे.