तहसीलदाराने घेतले तब्बल 15 लाख रुपये लाच


नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम यांना तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. नरेश बहिरम यांची नुकतीच 14 एप्रिल 2023 ला नाशिकला तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहिरम यांनी गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम माफ करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. एसीबीने याबाबत प्रेसनोट जारी करत कारवाईची माहिती दिली आहे.

एसीबीने नेमकं काय म्हटलंय?
संबंधित तहसीलदारांनी नाशिक जिल्ह्यातील राजुर बहुला तालुक्याच्या जमिनीच्या एका मालकाला जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० याप्रमाणे दंड देण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालकाने नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे परत पाठवण्यात आले होते.

सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालकाने म्हटलं होतं. याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदाराने जमिनीच्या मालकाला त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. पण जमिनीचे मालक हे वयोवृद्ध आणि आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिलेलं होतं. त्यामुळे तक्रारदार तहसीलदार यांच्या भेटीसाठी निरीक्षण वेळी गेले

यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी केली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे तहसीलदारांनी मान्य केले आहे. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम आज लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक तहसीलदार नरेश बहिरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.