विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वासी येथील घटना

कूरखेडा : तालुक्यातील कढोलीनजीक असलेल्या वासी येथील एका महाविद्यालयीन तरुणीने सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ जून रोजी घडली.

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. रुपाली गोपाल लटये (वय २०, रा. वासी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. कुरखेडा येथील डी. के. महाविद्यालयात ती गृहशास्त्र बी.ए. द्वितीय वर्षाला शिकत होती. १७ रोजी सायंकाळी ती अचानक घरातून बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेऊनही ती कुटुंबीयांना आढळली नाही

अखेर १८ रोजी घराजवळील विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे रहस्य कायम आहे. तपास पो.नि. संदीप पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शीतल माने करीत आहेत.