चिमूर : येथील आगाराची चिमूर- सिंदेवाही ही बस चिमूर बसस्थानकातून सकाळी सात वाजता सिंदेवाहीकडे जाण्यासाठी आरटीएम महाविद्यालयाजवळ आली असता महिला प्रवाशाने खिडकीतून उडी मारली. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता चिमूर-नेरी मार्गावर घडली. स्वाती प्रशांत येसांबरे, रा. तळोधी (नाईक) असे जखमी महिलेचे नाव आहे
तळोधी (नाईक) येथील स्वाती येसांबरे ही महिला सिंदेवाहीला जाण्यासाठी एमएच ४०एन ८९०४ क्रमांकाच्या बसमध्ये बसली, बसमध्ये चार प्रवासी होते. वाहक राऊत यांनी प्रवाशांना तिकीट देऊन आपल्या सीटवर बसले. चालक शालिक आवारी यांनी बस सुरू करून सिंदेवाही मार्गावर रवाना केली. दरम्यान, स्वाती येसांबरे या महिलेने धावत्या बसच्या
खिडकीतून उडी मारली. हा प्रकार वाहक, चालक व प्रवाशांच्या लक्षात येताच बस थांबविण्यात आली. प्रवाशांनी खाली उतरून पाहिले असता महिला प्रवाशाच्या डोक्याला व हाताला मार लागल्याचे दिसून आले. चालक- वाहकाने लगेच चिमूर येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. महिलेने धावत्या बसमधून उडी मारण्याचे कारण कळू शकले नाही. चिमूर पोलिस व चिमूर आगाराचे अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला.