आलापल्ली: लिलाव केलेल्या लाकडांमध्ये अतिरिक्त लाकडे टाकून तस्करी करणाऱ्या वनपालाचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीच पर्दाफाश केला. गुन्हा नोंदवून त्यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले. आलापल्ली वनपरिक्षेत्रात ८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.
आर. पी. दुर्गे असे त्या वनपालाचे नाव आहे. मध्यवर्ती काष्ट आगार क्रमांक-१ मधील सागवान व इतर लाकडांचा लिलाव झाला होता. हा माल नेण्यासाठी आलेल्या खरेदीदाराच्या वाहनात अतिरिक्त लाकडे टाकून तस्करीचा कट वनपाल आर. पी. दुर्गे याने रचला. मात्र, उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलिया यांना माहिती मिळाली. त्यांनी अहेरी वनपरिक्षेत्रतील वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेलंगणा राज्यातील गुडेम या
ठिकाणी सदर मालवाहू वाहन अडवून तपासणी केली. त्यात जादा माल आढळून आला. त्यानंतर जादा आढळलेला माल जप्त केला. याप्रकरणी वनकायद्यानुसार वनपाल आर. पी. दुर्गेवर गुन्हा नोंदवून त्यास निलंबित करण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.