सही पाहिजे? सात हजार अन् महागड्या ब्रँडची दारु पाठवा; लाचखोर अधिकारी रंगेहाथ जाळ्यात



जालना : भूमिगत नालीच्या बांधकामाच्या मोजमाप पुस्तिकेवर गटविकास अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणून देण्यासाठी एका ग्रामसेवकाने सात हजार रुपये रोख रकमेसह चार हजार रुपये किमतीच्या महागड्या ब्लॅक डॉग दारूची लाच म्हणून मागणी केली. चार हजार रुपये किमतीच्या महागड्या दारूची लाच म्हणून मागणी केल्याप्रकरणी या लाचखोर ग्रामसेवकावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूबरोबरच या लाचखोराने सात हजार रुपये रोख रकमेचीही मागणी केली आहे. सिद्धार्थ रामकृष्ण घोडके असं या लाचखोर ग्रामसेवकाचं नाव असून या घोडके यांच्याबरोबरच पुष्पा अंबुलगे या महिला ग्रामसेविकेवर देखील लाचखोरीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिगत नाली बांधकामाच्या मोजमाप पुस्तीकेवर (एम.बी.) आणि बांधकाम पूर्ण करणाऱ्या मजुरांना तसेच बांधकामासाठी साहित्य देणाऱ्या दुकानदाराला निधी अदा करण्याच्या परवानगी पत्रावर बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक होती.

गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन देण्यासाठी मांजरगाव येथील ग्रामसवेक सिद्धार्थ घोडके याने "तुमचं काम केलं आहे. त्यासाठी मला सात हजार रुपये रक्कम द्यावी लागेल. तसेच ब्लॅक डॉगचे चार हजार रुपयांचे २ खंबे द्यावे लागतील", असं म्हणून दारूची देखील मागणी केली.



यावेळी सिद्धार्थ घोडके याच्यासोबत असलेल्या महिला ग्रामसेवक पुष्पा अंबुलगे यांनीही तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. हा सगळा प्रकार अँटी करप्शन ब्युरोच्या पंचासमोर घडला. त्यामुळे लाचखोर ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके आणि महिला ग्रामसेवक पुष्पा अंबुलगे यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जालना अँटी करप्शन ब्युरो करत आहे.