घराघरात मटण वाटूनही आमचा पराभव झालास्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एक अचंबित करणारे विधान केले आहे. मतदार हुशार असतात. ते सर्व उमेदवारांकडून खात असतात, परंतु ज्यांना मत द्यायचे आहे त्यांनाच देत असतात.

असे सांगतानाच आम्ही एकदा घराघरात एक-एक किलो मटण वाटले होते, तरीही लोकांनी आमचा दारुण पराभव केला होता, असे विधान नितीन गडकरी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेकांकडून मोठमोठे हार्ंडग लावले जातात. अनेक उमेदवार हे मतदार राजाला पैसे वाटत असतात. त्यांची हवी ती सोय करतात, परंतु मला वाटते की, निवडणूक जिंकायची असेल तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, तरच निवडणूक जिंकता येते. कारण आम्ही एकदा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी घराघरात एक-एक किलो मटण वाटले होते, तरीही आमचा पराभव झाला, असे गडकरी म्हणाले.

आमदार, खासदारकीचे तिकीट मागायला येतात

पक्षातील अनेक जण मला भेटून खासदारकीसाठी तिकीट मागतात. खासदारकीचे तिकीट मिळणार नसेल तर आमदारकीचे तिकीट द्या, असे म्हणतात. हे दोन्ही नसेल तर विधान परिषदेत पाठवा असे आर्जव करतात. कुठल्या तरी आयोगावर घ्या, एखादे मेडिकल कॉलेज द्या, इंजिनीअरिंग कॉलेज द्या किंवा बीएड कॉलेज द्या, प्राथमिक शाळा द्या, यामुळे शिक्षकांचा अर्धा पगार आम्हाला मिळेल, अशा मागण्याही असतात. अशाने आपला देश बदलणार नाही, असेही गडकरी म्हणाले.