गडचिरोली जिल्ह्यात एकीकडे पुराचा कहर आहे तर दुसरीकडे रासायनिक खते व औषधींसाठी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून सामान्य शेतकऱ्याची लूट सुरू असून याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी केला. याबाबत त्यांनी २२ जुलै रोजी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
जिल्ह्यात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते धानाच्या वाढीसाठी रासायनिक खतांना प्रचंड मागणी आहे
याचाच गैरफायदा घेत काही कृषी केंद्र संचालक खतांचा कृत्रिम तुडवटा निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा छगन शेडमाके यांचा दावा आहे. काही विक्रेते विशिष्ट खत व औषधी खरेदीचा आग्रह करतात. यामुळे शेतकन्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. हलक्या दर्जाची खते व औषधीही शेतकऱ्यांच्या माथी मारली जाऊ शकतात. आरमोरी, देसाईगंज या भागात हा प्रकार राजरोस सुरू असून कृषी विभागाचे सोयिस्कर याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. लूट न थांबल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.