BJP नेत्याने अंगावर लघवी केली, मुख्यमंत्र्यांनी पाय धुतले! पीडित आदिवासी मजुराचे नवे फोटो चर्चेत


मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुब्री गावात एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ काल (४ जुलै) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्हिडीओची दखल घेत आरोपीला लवकरात लवकर अटक करावी व राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) नुसार कठोर कारवाई करावी, असा आदेश दिला होता. एकीकडे संबंधित व्हिडिओतील आरोपी तरुण प्रवेश शुक्ला याला आता अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवराज सिंह चौहान यांनी पीडित आदिवासी मजुराला मुख्यमंत्री निवासस्थानावर आमंत्रित केले आहे.

ANI च्या माहितीनुसार मध्य प्रवेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्हायरल व्हिडिओमधील पीडित दशमत रावत याला भोपाळ येथील निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले होते. याठिकाणी रावत यांचा रीतसर पाहुणचार करून मुख्यमंत्र्यांनी स्वहस्ते त्यांचे पाय धूतले आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा आहे. तो मजुरीचं काम करतो.

नेमकं प्रकरण काय?
एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली आहे. या आरोपीचे नाव प्रवेश शुक्ला असे असून त्याच्या वडिलांनी सुद्धा प्रवेश हा भाजपा आमदारांचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले आहे. आरोपीनं पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघवी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सादर व्हिडीओ हा मॉर्फ केलेला आहे आणि माझ्या मुलाला यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही प्रवेश याचे वडील रमाकांत शुक्ला यांनी सांगितले होते.

दरम्यान, मजूर तरुणावर लघवी केल्याप्रकरणी ५ जुलैला शुक्ला यास ताब्यात घेण्यात आले होते व त्याचे नावे असणारे बेकायदा बांधकाम स्थानिक प्रशासनाने पाडले आहे.