कुंभीटोल्यातील घटना : एक दिवसापासून होता बेपत्ता
कुरखेडा : आदल्या दिवसापासून घरून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शुक्रवार, दि. ९ जून रोजी गावालगतच्या नदीकाठावरील वडाच्या झाडाला स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथे दुपारी १२ वाजता उघडकीस आली. बालकदास लव्हाजी अंबादे (वय ५४) रा. कुंभीटोला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी बालकदास अंबादे हे गुरुवारी सकाळी ११ वाजता घरून बाहेर पडले. सायंकाळ व रात्र होऊनही ते घरी परतले नाही. तेव्हा कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते सापडले
नाहीत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी शेळ्या चारणाऱ्या एका इसमाला सती नदीलगतच्या वडाच्या झाडाला मृतदेह लोंबकळत असल्याचे दिसून आले.
याबाबत त्यांनी गावात माहिती दिली. तेव्हा अंबादे यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेत, मृतदेहाची ओळख पटविली. बालकदास यांनी आत्महत्या का केली, याचे नेमकेकारण कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच, कुरखेडाच्या पोलिस उपनिरीक्षक शीतल माने यांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता मृतदेह पाठविला. या घटनेबाबत कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील आहेत.
तीन महिन्यांत दुसरी घटना
नापिकीला कंटाळून कुंभीटोला येथील एका शेतकऱ्यांने या वर्षी मार्च महिन्यात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे तालुक्यात आंदोलन उभे राहिले होते. त्यानंतर, आता पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेचा शोध घेणे आवश्यक आहे.