धारदार शस्त्राने महिलेची हत्या; युवक गंभीर जखमीगोंदिया : स्थानिक चंद्रशेखर वॉर्डात गाढ झोपेत असलेल्या मायलेकावर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या घटनेत आईचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना आज (ता. ७) पहाटे ३ वाजता सुमारास उघडकीस आली. संध्या महेंद्र कोरे (४८) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर करण महेंद्र कोरे (२९) असे जखमी मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचे गुढ उकलण्याच्या कामाला लागले आहे. या घटनेला घेवून शहरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

स्थानिक चंद्रशेखर वॉर्ड येथे संध्या महेंद्र कोरे व करण महेंद्र कोरे हे दोघे | मायलेक एका भाड्याच्या खोलीत राहत होते. काल (ता. ७) नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपले होते. पहाटे ३ वाजता सुमारास कुणीतरी अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यातसंध्या व करण हे दोघे हल्ल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले. दरम्यान संध्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र करण हा जखमी अवस्थेतच पडून राहिला. काही वेळानंतर करणने आरडाओरड केल्यावर या प्रकरणाचे बिंग फुटले. या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी करण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर दुसरीकडे संध्याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पो. नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तुर्त पोलिस कामाला लागली आहे. हत्या करणारे आरोपी कोण, या मागचे उद्देश काय ? या सर्व प्रश्नांचे उत्तर पोलिसांच्या तपासकार्यानंतरच समोर येणार आहे.