शंभरपेक्षा अधिक तरुणींसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर झालं भलताचशंभरहून अधिक तरूणींचं लैंगिक शोषण, व्हीडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्याला जन्मठेप; काय आहे प्रकरण?

शंभरपेक्षा अधिक तरुणींसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तामिळनाडूमधील नागरकोईलमधलं हे प्रकरण आहे. काशी असं या तरूणाचं नाव आहे.

हे सगळं प्रकरणं नेमकं काय होतं? या तरुणानं इतक्या महिलांना कसं फसवलं ? हा प्रकार उघडकीस कसा आला?

काशी हा नागरकोईलमधल्या गणेशपुरम परिसरात राहणारा होता. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो अनेक महिलांशी संपर्कात असायचा.

यांपैकी अनेक जणींशी त्याचे शारीरिक संबंधही होते. या महिलांसोबतच्या जवळीकीचे त्याने फोटो काढले होते, व्हीडिओ शूटिंगही केलं होतं. त्याचाच आधार घेऊन तो या महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा.


चेन्नईमधील एका डॉक्टर तरूणीचीही काशीने अशीच फसवणूक केली होती. तिने 2020 साली या प्रकरणी कन्याकुमारीमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि नागरकोईल जिल्ह्यातल्या कोट्टर पोलीस ठाण्यात काशीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

तपासात काही धक्कादायक खुलासे समोर आले.

तामिळनाडू तसंच बंगळुरूमधल्या तरूण मुली, शाळा तसंच कॉलेजमधल्या विद्यार्थिनींची काशीने अशीच फसवणूक केली होती. त्याला बळी पडलेल्या तरूणींची संख्या शंभरहून अधिक होती.


त्यावेळी काशीने धमकी दिलेल्या, ब्लॅकमेल केलेल्या काही महिलांचे रडतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यावरून बराच वादंग, तणावही निर्माण झाला होता.

दरम्यान काशीविरुद्ध पोक्सो (POCSO), महिलांचं लैंगिक शोषण करून त्याचं रेकॉर्डिंग करणं, पैशांसाठी ब्लॅकमेल अशा तक्रारी होत्या. त्याआधारे कन्याकुमारीमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात 7 गुन्हे दाखल करण्यात आले. एप्रिल 2020 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली.

काशीचे वडील थंगपांडियन यांनाही पोलिसांनी अटक केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मात्र, वर्षभराने जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. काशीच्या दोन मित्रांनाही त्याला मदत केल्याबद्दल अटक झाली.


पोलिसांनी काशीने वापरलेला लॅपटॉप तसंच स्मार्ट फोन तपासला, तेव्हा त्यांना त्यात शेकडो पोर्नोग्राफिक फोटो मिळाले. काही महिलांचे रेकॉर्ड केलेले व्हीडिओही त्यात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मोबाईलमध्ये तरुणींचे 1900हून अधिक नग्न फोटो आणि 300 हून अधिक नग्न व्हीडिओ होते.

त्याच्याविरोधातील सर्व खटल्यांची सुनावणी नागरकोईल महिला न्यायालय आणि विशेष पोक्सो कोर्टात झाली. (एक पीडिता ही अल्पवयीन होती.)


बुधवारी (14 जूनला) या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. मॅजिस्ट्रेट जोसफ जॉय यांनी काशीला भारतीय दंडसंहितेच्या कलम 376(2), 354 C आणि 506(22) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच त्याला एक लाख रुपयांचा दंठही ठोठावला.

या प्रकरणातील सरकारी वकिलांनी बीबीसी तमीळशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणातील पुरावे हे तोंडी आणि वैज्ञानिक असे दोन्ही स्वरुपाचे होते. तोंडी पुराव्यांमध्ये पीडितांचे जबाब होते, तर वैज्ञानिक पुराव्यांमध्ये व्हीडिओ, फोटो यांची सायबर तज्ज्ञांनी केलेली पडताळणी होती.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं, “काशीच्या वकिलांनी बचावासाठी विविध युक्तिवाद केले. पीडितांनी तक्रार दाखल करायला एवढा वेळ का लावला, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे त्यांनी वेळ काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तसंच उच्च न्यायालयातही वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. मात्र त्या सगळ्या फेटाळून लावण्यात आल्या. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.”

पुरावे लपविण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या काशीच्या वडिलांची मात्र न्यायालयाने मुक्तता केल्याचंही त्यांनी सांगितलं.

या प्रकरणात 2022 पर्यंत तपास अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या आणि सध्या कन्याकुमारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या इन्स्पेक्टर शांती यांच्याशी बीबीसी तमीळने संवाद साधला.

त्यांनी म्हटलं की, या प्रकरणाची सुनावणी खूप आव्हानात्मक होती. आम्ही खूप वेळेत आरोपपत्र दाखल केलं आणि आरोपीला जामीन कसा मिळणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली. त्याचाच परिणाम म्हणून अटकेपासून खटला चालेपर्यंतच्या तीन वर्षांच्या काळात तो तुरूंगातच राहिला, बाहेर येऊ शकला नाही.

“या प्रकरणात शंभरहून अधिक तरुणींचं शोषण झालं होतं. या तरुणी चांगल्या घरातल्या होत्या. त्यांनी निकालानंतर आमच्याशी बोलताना समाधान व्यक्त केलं,” शांती सांगतात.

काशीविरोधात दाखल केलेल्या 7 पैकी एका प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य प्रकरणांपैकी दोन प्रकरणात आरोपपत्र दाखल झालं नसल्याचं सांगितलं जात आहे.