मुंबई (ए). जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी राज्यात मान्सूनची चाहूल अद्यापही लागलेली नाही. महाराष्ट्रात ११ जूनला पोहोचलेल्या मान्सूनने तळकोकणातच आपला तळ ठोकला आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास सध्या थांबला असून, तो आणखी काही दिवस लांबणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात जोर धरण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयापलीकडे न गेल्याने मान्सून अत्यंत क्षीण झाला आहे. सध्या तो तळकोकणात असला, तरीही चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली. त्यामुळेही पुढे जाण्याइतका जोर सध्या नाही. त्यामुळे तो २५ जूननंतरच जोर धरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन चार दिवस झाले, तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्याने बळीराजासह लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, यंदा मान्सूनबाबत जवळपास ९० टक्के अंदाज चुकले आहेत. भारतात मान्सून हा ३० मे ते ४ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता परंतु असे झाले नाही. बऱ्याच ठिकाणी सात जून ते आठ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन झाले होते; चक्रीवादळामुळे मान्सून महाराष्ट्रात पोहोचलाच नाही.