मद्यधुंद अधिकारी, कर्मचाऱ्यास ग्रामस्थांनी धू… धू… धुतले, सहकाऱ्यांनी काढला पळ; कारण काय, वाचा…


वर्धा : अधिकारपदाची नशा व त्यात पुन्हा मद्यही ओतल्या गेले तर मग पाहायलाच नको. असेच या घटनेत झाले. मात्र सार्वजनिक तमाशा झाल्याने चांगलीच चर्चा उसळली.

झाले असे की, देवळी पंचायत समितीच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा विवाह कळंब येथे असल्याने त्याचे कर्मचारी बंधूही पोहोचले. त्यात एक कृषी अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, आपले सरकार केंद्राचा एक अधिकारी व अन्य कृषी दौऱ्याच्या नावाखाली कळंबला धडकले. यापैकी काही विरंगुळा म्हणून बारमध्ये शिरले. दारू पिल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनाचा धक्का दुसऱ्या एका वाहनास बसला. त्यामुळे चांगलाच वाद सुरू झाला.

एका अधिकाऱ्याने दुसऱ्याच्या नाकावर मारल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली. काहींनी संतप्त होत एका अधिकारी व कर्मचाऱ्यास पकडून बेदम धुतले. ही मारहाण पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र पळ काढला. शेवटी प्रकरण कळंब पोलिसांत दाखल झाले. तिथे बुधवारी रात्रीपर्यंत बराच काथ्याकूट झाल्याची माहिती आहे
ठाण्यातील अभय चोथनकर म्हणाले की, वाद झाल्याने दोन्ही गट ठाण्यात आले होते. तक्रार दाखल करणार असल्याचे म्हणाले. पण पुढे आपसात तोडगा काढणार असल्याची माहिती देण्यात आली. इकडे वर्धा जिल्हा परिषद कृषी अधिकारी बमनोटे म्हणाले की, हा प्रकार समजल्यावर वरिष्ठांना माहिती दिली. आता त्यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करू.