Panjabrao Dakh यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल असा अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रोत्साहीत करणारे कथित हवामानतज्ञ पंजाबराव डख पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानंतर आता दुष्काळ पडणार आहे असं डब्बल ढोलकी भूमिका सध्या डख निभावत त्यांनी एक नवा व्हिडीओ रिलीज केल्यानं त्यांच्यावर शेतकरी मात्र संतापले आहेत.
मागील वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामानाचे अंदाज सांगून पंजाबराव डख हे व्यक्तिमत्व लोकप्रिय झाले होते. त्यात काही शेतकरी डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचं मत व्यक्त करताना दिसत होती. त्यामुळे पंजाबराव हे सर्वत्र परिचित झाले. मात्र मागील वर्षी हवामान अंदाज अचूक ठरल्यानंतर आता सातत्यानं चुकीचे हवामान अंदाज येत असल्यानं यांच्या हवामान अंदाजावर दबक्या आवाजात शेतकऱ्यांमधे चर्चा आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर पंजाबराव डक पाटील हे हवामानतज्ज्ञातले, पंडित धिरेंद्रशास्त्री बागेश्वर महाराज आहेत ! असं म्हणताना दिसत आहेत तर काहीजण त्यांना हार्प तंत्रज्ञान राबवणारे दलाल आहेत असं एकांतात चर्चा करताना म्हणताना दिसत आहेत. त्यात सोशल मिडीयावर भगवान पवार नावाचे नेटकरी म्हणाले की, मी डख साहेबांना २०१६ पासून फाॅलो करतो. तेव्हा त्यांचे नाव गाव ही झाले नव्हते. २०१६ ते २०१८ या दुष्काळी सालातील त्यांचे बहुतांशी अंदाज चुकले. २०१९ ते २०२२ या चार वर्षांतील त्यांचे बहुतांशी अंदाज खरे ठरले. तर सारं काही सुरळीत चालू असताना नेमके २०२२ मे जुन अन् २०२३ चा मे जुनचेच त्यांचे अंदाज का चुकलेत. का हे अंदाज स्क्रीरप्टेड होते दॅटीजे क्वेश्चन ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
एप्रिलच्या सुरवातीपासून पंजाबराव डख यांनी राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं भाकीत व्यक्त केलं होतं. परंतु पंजाबराव डखांच्या या पलटीवर शेतकरी उमेश गायकर म्हणाले, एक गाजलेले हवामान अभ्यासक…त्यांचे अक्षरशः हजारेक व्हाट्सअप ग्रुप, अनेक यू ट्यूब चॅनेल एवढा पसारा. आणि ब्रेकिंग न्युज प्रमाणे रोजच पावसाचे अंदाज ३६५ दिवसात ३६५ अंदाज. साहजिकच काही गोळ्या लागायच्या काही हुकायच्या. पण हुकलेल्याचा डेटा कोण ठेवतो, लागलेल्याचा ‘डंखा’ त्रिखंडात. आणि भाषा… धुवुन काढणार, आजवर बघितलं नसेल असा पाणी पडणार, वाहून जाणार, भयानक पाऊस… द्राक्षं उतरायला आलेली असतात तेव्हा हलकासा हवामान बदल देखील शेतकऱ्याचा बीपी वाढवतो. त्यात असल्या भाषेत अंदाज ऐकून अनेकजण सलाईन वर गेले असतील. तीन वर्षात मार्केटला या अभ्यासकाने अक्षरशः झोपवले. अनेक शेतकऱ्यांनी विनंत्या केल्या, आर्जव केली. तुम्ही क्लिपा ऐकल्या असतीलच, पण साहेब आपल्याच धुंदीत. योगायोगाने तीन वर्षात पावसाने थैमान मांडल्याने यांचे अंदाज बरोबर ढगात लागत. आता मात्र त्यांचा कस लागलाय…कधी नव्हे तो ! आमचं लक्ष आहे. पावसाने दडी मारल्यावर किती अंदाज बरोबर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच शेतकरी संदीप कोकाटे म्हणाले, अंदाज चुकला म्हणतो हा बाबा , म्हणजे हवामान खते मार्च -एप्रिल पासून सांगत होत की, दुष्काळ आहे आणि हा भाऊ खूप पाऊस पडेल म्हणत आणि आता अंदाज चुकला म्हणतो.
पंजाबराव डखांनी व्यक्त केलेल्या आंदाजामुळे शेतकऱ्यांनी जोरदार पेरणीची तयारी केली होती. भारतीय हवामान विभाग (IMD)कडून वारंवार यंदा अलनिनो वर्ष असल्यानं सरासरी इतका पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र डकांचा देव केलेल्यांना हे हवामान खात्याच सांगितलेले पटत नसल्याचे सध्यातरी दिसत नाही. तर सोशल मिडीयात अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे हवामान अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांची फसवणुक होते, याविषयी MaxKisan ने भारतीय हवामान विभागाचे (IMD)चे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी संवाद साधला होता. हवामान अंदाज ही शास्त्रीय पध्दत असते, सर्वच हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवर मांडले जातात. शेतकरी आता जागरुक होत असल्याने भविष्यात बोगस हवामान अंदाजकांची दुकानं बंद होतील असं ते म्हणाले.
हवामान अंदाजातील या बोगसगिरीबद्दल MaxKisan ने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी चर्चा केली. डॉ. साबळे म्हणाले, मी काही वर्षापुर्वी एका शेतकरी कार्यक्रमासाठी परभणी या ठिकाणी गेलो होतो. एक शेतकऱ्यांचा गट एका व्यक्तीला माझ्याकडे घेऊन आला. म्हणाले, सर हे हवामान अंदाज व्यक्त करतात. त्यांना तुमचा फक्त आर्शिवाद द्या. मी त्यांना सांगितले, हवामान अंदाज व्यक्त करण हा येगागबाड्याळाचा खेळ नाही. आकडेवारी, शास्त्रीय माहीती सोबत तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी अभ्यास लागतो. तुम्ही हे करु नका असं मी त्यांना सांगितलं. परंतू पुढील काही वर्षात हेच गृहस्थ पंजाबराव डख म्हणुन पुढे आले, आता ते अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत बनलेल. हवामान अंदाज ही शास्त्रीय क्लिष्ठ प्रक्रीया आहे, असे बुडबुडे येतील आणि मिटतील असं डॉ. साबळे म्हणाले.
सोशल मीडियावर पंजाबराव डख व नाशिकमधील एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग असलेला एक व्हिडिओ धुमाकूळ घालत असल्याने सध्या महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. ही काॅल रेकाॅर्डिंग सध्या शेतकऱ्यांमध्ये वेगाने व्हायरल होत असून यामध्ये परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यावर शेतकऱ्याकडून काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ते म्हणतात की, पंजाबराव डख हे काही कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेतात ! यामुळे ही रेकॉर्डिंग सध्य चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात मॅक्सकिसानने पंजाबराव डख यांच्याशी प्रतिक्रीयेसाठी संपर्क साधला. परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हवामान खाते व पंजाबराव डख या दोघांच्या घोळाघोळात शेतकरी देशोधडीला जात अशी चर्चा लोकांमध्ये आहे.
-०-