मागासवर्गीय दांपत्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सामुहीक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणा-या मागासवर्गीय (अनु.जाती,विजाभज व इमाव ) पात्र दांपत्यास प्रति जोडपे रु. 20,000/- इतके आर्थिक सहाय्य करण्यात येते. तसेच सेवाभावी संस्था, शासकीय प्रधिकरणे किंवा जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळयामध्ये केल्या जाणा-या खर्चासाठी प्रति पात्र जोडपे रु. 4,000/- अनुदान शासनाव्दारे देण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्ती मधे वधु व वरांचे निकष पुढिल प्रमाणे - 1. वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असले पाहिजे. 2. नवदांपत्यातील वधु/वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती व (नवबौध्दसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील असावेत. 3. वधु व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय आहे. 4. बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दांपत्या /कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे आवश्यकआहे. 5. वधु व वर यांचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे.
सामुहिक सोहळा आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्था/यंत्रणेचे निकष - 1. स्वयंसेवी संस्था/यंत्रण, स्थानिक नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वत अधिनियम 1850अंतर्गत नोंदणीकृत असावी. 2. सामुहिक विवाहासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था/यंत्रणा सेवाभावी असावी. तसेच केंद्र/राज्य शासकीय स्वायता संस्था/शासकीय प्राधिकरणे/सार्वजनिक प्राधिकरणे/जिल्हा परिषद असावीत. 3.संस्था/केंद्र/राज्यशासकीय स्वयता संस्था/शासकीय प्राधिकरणे/सार्वजनिक प्राधिकरणे/जिल्हा परिषद
यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळयामध्ये केला जाणा-या खर्चासाठी प्रति पात्र जोडपे रु. 4,000/- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. 4. सामुहिक विवाह सोहळयासाठी किमान 10 दांमत्ये असणे आवश्यक राहील. 5. सेवाभावी संस्था/यंत्रणेने सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी झालेल्या मागासवर्गीय
जोडप्यांची परिशिष्टाप्रमाणे माहिती/संबंधितांची छायाचित्रे विहीत नमुन्यातील अर्ज इ. कागदपत्रे विवाह संपन्न होण्याच्या किमान 15 दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या
कार्यालयाकडे सादर करावीत. वरील योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळे आयोजित करुन इच्छिणा-या सेवाभावी/ शासकीय प्राधिकरणे यांनी अधिक माहिती करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
*अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी 'स्टँड अप इंडिया' मार्जिन मनी योजनेबाबत*
गडचिरोली, दि.११ : केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र १८ वर्षावरील नवउद्योजक तरूणांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 'स्टॅंड अप इंडिया' योजनेअंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५% हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक मासाका-2018/प्र.क्र. 259/ (2)/अजाक, दिनांक 8 मार्च, 2019 व शा. नि. क्रमांक स्टँडई-2020/प्र.क्र.23/अजाक, दि. 09.12.2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चीत करण्यात आल्या आहेत. सदर चा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
गडचिरोली जिल्हयातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरूणांनी कार्यालय, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी ऑफीस रोड, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.
*विशेष शिकवणी वर्ग योजनेसाठी संस्थेमार्फत अर्ज आमंत्रित*
गडचिरोली,(जिमाका)दि.11: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, वडसा, कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी, धानोरा व कोरची या सात तालुक्यात 24 शासकिय आदिवासी आश्रमशाळांमध्ये सन 2021-22 या वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत आश्रमशाळेतील वर्ग 10 वी 12 वी (कला/विज्ञान) विशेष शिकवणी वर्ग आयोजित करणे हि योजना मंजुर आहे. सदर योजना 2022-23 मध्ये राबवायची असल्याने इच्छुक संस्थेनी प्रस्ताव प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली या कार्यालयास दिनांक 15 मे पर्यंत सादर करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी केलेले आहे.
*****
गडचिरोली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न
गडचिरोली,(जिमाका)दि.11: विशेष सहाय्य योजने अंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध अंपग शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्तया, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्याकरीता गडचिरोली तालुक्यातील शासकीय योंजनांची जत्रा महाराजस्व अभियानात जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज तलाठयांमार्फत भरुन घेण्यात येतात. विशेष सहाय्य योजने अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज दिनांक 28 एफ्रिल 2023 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती समोर ठेऊन समितीचे अध्यक्ष तहसिलदार, तहसिल कार्यालय गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यात आली. सदर सभेला मुख्याधिकारी, नगरपरिषद गडचिरोली व संवर्ग विकास अधिकारी पं.सं. गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते.
सदर सभेत पुढील प्रमाणे अर्ज मंजुर/नामंजुर करण्यात आले. योजनेचे नाव- संजय गांधी निराधार अनुदान योजनेकरीता एकूण प्राप्त प्रकरणे 17 त्यापैंकी 17 मंजूर प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 06 प्राप्त प्रकरणे त्यापैकी 05 मंजूर प्रकरणे तर 01 प्रकरणे नामंजूर, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना प्राप्त प्रकरणे 40 त्यापैकी 34 मंजूर प्रकरणे तर 06 नामंजूर प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकुण प्राप्त प्रकरणे 22 त्यापैकी 18 मंजूर प्रकरणे तर 04 नामंजूर प्रकरणे झालीत.
तसेच वरिल आयोजीत सभेच्या वेळी डी. ए. ठाकरे नायब तहसिलदार,(सं.गां.यो) तहसिल कार्यालय गडचिरोली, एल. एम. अल्लीवार अव्वल कारकुन, कु. एस. व्ही. कोडापे महसूल सहाय्यक व कु. रजनी डोंगरे डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी विशेष सहाय्य योजनेची प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले. विशेष सहाय्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज महाराजस्व अभियानात किंवा तहसिल कार्यालयात तलाठयां मार्फत सादर करणेबाबत महेंद्र गणविर, तहसिलदार, गडचिरोली यांनी जाहीर आवाहन केले आहे. असे नायब तहसिलदार, (संगांयो) गडचिरोली, ङि ए. ठाकरे यांनी कळविले आहे.
महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण
दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ; प्रतीमाह 10 हजार विद्यावेतन
गडचिरोली,(जिमाका)दि.11: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील दीड हजार युवकांना मोफत मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या 1500 ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत 75 टक्के उपस्थितीच्या अटीवर प्रशिक्षणार्थ्यास दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आकस्मिक निधी एकवेळ 12 हजार रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 मे ठेवण्यात आलेली आहे.
हे प्रशिक्षण इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन, अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 12 वी उत्तीर्ण व वैद्यकीय अर्हता पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम निवडीसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच संस्थेच्या 0712-2870120/21 या क्रमांकवर संपर्क करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.
******
*हिकेर जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत*
गडचिरोली,(जिमाका)दि.11: मौजा- हिकेर जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) ता.एटापल्ली जिल्हा गडचिरोली जंगल परिसरात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना हिकेर जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात एक पुरुषाचा मृतदेह सापडल्याने सदर मृत्यूचे कारण तपास करणेकामी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, सुरु केली असून सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करावयाची आहे. तरी वरील घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी, प्रत्यक्षदर्शी चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे समक्ष जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एटापल्ली कळविले आहे. माहितीमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन, आपण आपला या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्याविषयी आपले म्हणणे व या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती या प्रकारे सादर करायची आहे.
तालुकास्तरावर होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन
गडचिरोली,(जिमाका)दि.10: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, स्तरावर राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण तालुका स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्रम देखरेख तथा नियंत्रण समिती सुदधा गठीत करण्यात आलेले आहे. तालुकास्तरावर तहसिलदार यांना अध्यक्ष, व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सदस्य सचिव, म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सदर महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर फ्लॅगशिप कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयात तालुकानिहाय १ मे २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान राबविण्या संदर्भात नियोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय प्रमुख हे सदर कार्यक्रमात सहभागी होणार असून त्या त्याविभागांतर्गत राबविण्यात येणा-या योजनांच्या अनुषंगाने स्टॉल लावुन प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे तसेच शिबीरस्थळी प्राप्त होणा-या महिलांच्या तक्रारींचे निवारण संबंधीत विभागाने शक्यतो तिथेच करणार आहेत व प्राप्त होणा-या प्रत्येक तक्रार
अर्जाची विभागाव्दारे नोंद घेवून त्याचे निराकरण तातडीने करण्यात येणार आहे. शिबीराच्या अनुषंगाने संबंधीत तालुक्यातील तहसिल कार्यालय किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन होणाऱ्या तालुकास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेवून आपल्या तक्रारी / समस्या नोंदविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.
****