लखनऊ: उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. सतत वाद होत असल्यानं एक जोडपं समुपदेशनासाठी पोहोचलं. दोघांनी एकमेकांवर दारु पिऊन तमाशा करत असल्याचे, चारचौघांत शिवीगाळ करत असल्याचे आरोप केले. पत्नी दारु पिते, चारचौघात लाज काढते, चौकात वाद घालते, तमाशा करते, असे आरोप पतीनं केले.
पतीनं पत्नीचे व्हिडीओ समुपदेशन करणाऱ्या महिलेला दाखवले. व्हिडीओमध्ये पती घाबरुन पळताना आणि पत्नी त्याला शिवीगाळ करचाना दिसत होती. पतीनं त्याचं गाऱ्हाणं समुपदेशक महिलेसमोर मांडलं. यानंतर पत्नीनं तिची व्यथा मांडली. 'पती आधी दररोज दारु पिऊन यायचा. घरी येऊन दररोज नवे बहाणे करुन मला मारायचा. हे सगळं नित्याचंच झालं होतं. पतीच्या त्रासाला कंटाळून मी बेवडी असल्याचं नाटक सुरू केलं. मी दारु पित नव्हते. पण पतीला त्याच्याच पद्धतीनं, त्याच्याच भाषेत उत्तर देत होते. मी केवळ दारु पिऊन आल्याचा अभिनय करत होते,' असं महिलेनं सांगितलं. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर समुपदेशक महिलेनं दोघांना समजावलं.
समुपदेशकानं पतीला दारु न पिण्याचा सल्ला दिला. त्यावर पतीनं आठवड्यातून केवळ एकदा दारु पिणार असल्याचं सांगितलं. पतीला कधीच मारहाण करणार नाही असा शब्द त्यानं दिला. समुपदेशकानं पतीकडून सगळं काही लिहून घेतलं. यानंतर पत्नीचं समाधान झालं. दोघे सोबत घरी गेले. या जोडप्याच्या वादाची, भांडण मिटवण्यासाठी निघालेल्या तोडग्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.