गोंदिया, : शेतात जाण्याच्या मार्गात अटकाव केल्याने देवरी तालुक्यातील शिलापूर येथील बळीराम जीवन बघेले (वय 55 ) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 13 फेब्रुवारी 2023 रोजी सायकांळी 6 वाजताच्या सुमारास घडली होती. दरम्यान, या प्रकरणी देवरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास केला. तपासाअंती या प्रकराणात सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
बळीराम यांची शिलापूर येथे गट क्रमांक 401/1/अ मध्ये शेत जमीन आहे. दरम्यान, ते पारंपारीक शासकीय नहराच्या पाळीने दरदिवशी शेतात ये- जा करीत होते. मात्र, दोन आरोपींनी त्यांना सदर रस्त्याने जाण्यास अटकाव केला. यावर त्यांनी परिसरातीलच तळ्याच्या पाळीने नवीन रस्ता तयार करून ये-जा सुरू केली. यावेळी जुने
दोन व इतर चार अशा सहा आरोपींनी संगनमत करून त्यांना नवीन रस्त्यावरूनही जाण्यास मनाई केली. ही गोष्ट मनावर घेत बळीराम यांनी 13 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी देवरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. ज्यामध्ये सदर सहा आरोपींनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आढळून आले. दरम्यान, जिल्हा सत्र अभियोक्ता यांच्या अभियाप्रायावरून देवरी पोलिसांनी सर्व सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.