प्रवचन देणारा बुवा आयोजकाच्या पत्नीला घेऊन पसार; पोलिसांनी पकडल्यावर महिला म्हणाली…


मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने रामकथेचं पारायण ठेवलं होतं. परंतु हा कथावाचनाचा कार्यक्रम यजमानाला महागात पडला आहे. कारण कथावाचनासाठी आलेल्या कथावाचकाच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीला पळवून नेलं आहे. पीडित पतीने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली.

पोलिसांनी एक महिनाभर शोधाशोध केल्यानंतर तक्रारदाराची पत्नी सापडली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं. तिथे पोलिसांसमोर महिलेने तिच्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. महिलेने चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचा शिष्य नरोत्तम दुबे याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली

याप्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमित सांघी म्हणाले, पती-पत्नीमधील भांडणांमुळे पत्नीला तिच्या पतीसोबत राहायचं नाही. तिला दुबे याच्यासोबत राहायचं आहे. त्यामुळे याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद करता येत नाही तसेच कारवाई करता येत नाही. तरी पोलीस तिवारी यांच्या तक्रारीनुसार तपास करत आहेत.