लग्न आटोपून निघताच कंटेनरने उडविले ,महिलेचा जागीच मृत्यू; एक जण जखमी
 पिपळगाव (भो.) : वडसा देसाईगंज हायवेवरून ब्रम्हपुरी मार्गावरील कर्मवीर कन्नमवार हायस्कूलजवळ एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८:०० वाजताच्या सुमारास घडली.


अनिता देवराम बगमारे (५५, रा. काता) असे मृत महिलेचे नाव आहे. कालेता येथून अनिता देवराम बगमारे या आपल्या भाऊजी रुपेश रघुनाथ बगमारे यांच्यासोबत सुरबोडी येथील कर्मवीर कन्नमवार हायस्कूलमध्ये होत असलेल्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. गावाकडे परत जाण्यासाठी भाऊजीसोबत दुचाकीने निघाल्या. मात्र, तिथेच वडसावरून ब्रम्हपुरीकडे येत असलेल्या कंटेनरने (क्र. एमएच ४६ बीएम ६११३ ) दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही खाली पडले. अशातच अनिता बगमारे यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर रुपेश बगमारे हे गंभीर जखमी झाले.


कंटेनर चालक फरार

महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच वहाडी मंडळीनी कंटेनरला अडविले. मात्र, कंटेनरचालक पसार झाला. ब्रम्हपुरीचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सपोनि.. राजेश उंदीरवाडे, संदेश देवगडे करीत आहेत.