तलाठ्याला रेती तस्करांकडून मारहाणधामणगाव रेल्वे (वा) : रेती लिलावाचे धोरण ठरवून शासनाच्या रेती डेपो उभारणीचा प्रश्न तालुक्यात अधांतरी असतांना परिसरातील लहान मोठ्या नद्यांमधील रेतीची चोरांनी विल्हेवाट लावली आहे. दरम्यान तळेगाव दशासर परिसरात रेती चोरी करणा-या एका ट्रॅक्टरला रंगेहात पकडल्यात आल्याच्या कारणावरून तलाठ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

8 मे रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान तळेगाव दशासर भाग 3 वर कार्यरत असलेल्या तलाठी मिलिंद पंडितराव सिरसाट यांना गुप्त माहिती मिळाली की, तळेगाव दशासर येथील घुटकी नाला येथून रेतीचे अवैध उत्खन्नन करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती चोरी होत आहे. या माहितीवरून तहसीलदार वासीमा शेख मेहबूब यांच्या मार्गदर्शनात सिरसाट यांच्यासह तलाठी विजय गाते व कोतवाल अजय नेरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रेती माफिया म्हणून परिचित असलेले आशिष कारमोरे, स्वप्निल टारपे हे मजुरांच्या सहाय्याने विना वाहन क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेती चोरून भरतांना आढळून आले. त्यानंतर ट्रॅक्टरला

पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे घेऊन येत असताना 3.30 वाजताच्या दरम्यान आसेगावजवळ आशिष कारमोरे व त्याचा मित्र स्वप्नील टारपे हे बोलेरो वाहन घेऊन पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टरला अडवणूक करून तलाठी शिरसाट यांच्याशी धक्काबुक्की केली. मोबाईल फोन व दुचाकीची चावी हिसकावून तलाठी शिरसाट यांना जीवे मारण्याची धमकी दिली. चोरीच्या रेतीसह भरून पुढील कारवाईसाठी जात असलेला ट्रॅक्टर बळजबरीने घेऊन जातांना सुध्दा या दोघांनी महसूल पथकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान सदर प्रकरणात तहसीलदार व वासीमा शेख मेहबूब यांच्या आदेशाने तलाठी शिरसाट यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.