गडचिरोली: मुख्य चौकात ट्रक-स्कार्पिओची समोरासमोर धडक



गडचिरोली, ब्युरो. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात अपघाताची मालिका सुरुच आहे. स्थानिक इंदिरा गांधी चौकात बुधवारी, दुपारी 3 वाजताच्या सुमारास ट्रक व स्कार्पिओची समारोसमोर धडक बसल्याची घटना  घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्हा मुख्यालय असलेल्या

गडचिरोली शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमणामुळे शहरात मागील काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक नागरिकांचा जीव गेला. या अपघाताचे मुख्य कारण चारही मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण ठरत असल्याने प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत होता. याची दखल घेत नप प्रशासनाने शहरातील चारही मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम आरंभली आहे. अतिक्रमणावर नपने बुलडोजर चालविल्याने इंदिरा गांधी चौकासह शहरातील प्रमुख रस्ते मोकळे झाले आहेत



अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच असताना स्थानिक इंदिरा गांधी चौकात पुन्हा अपघात घडला. सीजी 08 एके 9097 या चामोर्शी मार्गावरुन इंदिरा गांधी चौकाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणा-या एम. एच. 04 जीझेड 9599 क्रमाकांच्या स्कार्पिओने ट्रकला धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळ मुख्य चौकातील वाहतूक सेवा विस्कळीत पडली होती.